Join us

बाऊन्सर आदळला, तो जमिनीवर पडला आणि त्याला फिल ह्युजची आठवण आली

कारण ह्युजवर ऑस्ट्रेलियातील एका स्थानिक सामन्यात बाऊन्सर आदळला होता. त्यानंतर ह्युज जमिनीवर पडला. त्यानंतर ह्युजला हॉस्पिटलला नेताना त्याचा मृत्यू झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 20:02 IST

Open in App

नवी दिल्ली : एखाद्या खेळाडूवर बाऊन्सर आदळला आणि तो जमिनीवर पडला तर अजूनही क्रिकेट चाहत्यांना ऑस्ट्रेलियाचा दिवंगत सलामीवीर फिल ह्युजची आठवण येते. कारण ह्युजवर ऑस्ट्रेलियातील एका स्थानिक सामन्यात बाऊन्सर आदळला होता. त्यानंतर ह्युज जमिनीवर पडला. त्यानंतर ह्युजला हॉस्पिटलला नेताना त्याचा मृत्यू झाला होता, अशीच एक गोष्ट ऑस्ट्रेलियाच्या एका फलंदाजाबाबत घडली होती. तो फलंदाज होता स्टीव्हन स्मिथ. अॅशेस मालिकेतील तिसऱ्या सामन्यात स्मिथला चेंडू लागला आणि तोही जमिनीवर कोसळला होता. त्यावेळी त्याला ह्युजची आठवण आली होती, असे दस्तुरखुद्द स्मिथने सांगितले आहे. 

तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला स्मिथला बाद करता आले नाही. पण आर्चरने एका बाऊन्सद्वारे स्मिथला जायबंदी केले आणि त्यामुळेच स्मिथला दुसऱ्या डावात फलंदाजी करता आली नाही.  स्मिथ हा इंग्लिश गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर एक उसळता चेंडू मानेवर लागून जखमी झाला. त्यावेळी स्मिथ 80 धावांवर खेळत होता. मात्र या वेदनेतून सावरत स्मिथने पुढे फलंदाजी केली. पण दुसऱ्या दिवशी उठल्यावर स्मिथला त्रास होऊ लागला. त्यामुळे या सामन्यात पुढे खेळणे त्याच्यासाठी अशक्य झाले.

स्मिथ जायबंदी झाल्यावर पाचव्या दिवशी सकाळी सामनाधिकारी रंजन मदुगले यांची भेट घेऊन त्याच्या जागी मार्न्स लाबुशेन याचा संघात समावेश करण्याचे पत्र ऑस्ट्रेलियाने दिले. त्यानंतर उर्वरित लढतीसाठी लाबुशेनचा संघात समावेश करण्यात आला. दरम्यान, फलंदाजीस आल्यावर लाबुशेन यालाही जोफ्रा आर्चरच्या उसळत्या चेंडूचा प्रसाद मिळाला. मात्र लाबुशेनने धैर्याने खेळ करत मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवला आणि 59 धावांची सुरेख खेळी करत सामना अनिर्णितावस्थेकडे झुकवण्यात मोलाचा वाटा उचलला.

याबाबत स्मिथने पत्रकारांना सांगितले की, " जेव्हा माझ्यावर बाऊन्सर आदळला तेव्हा माझ्या डोक्यामध्ये बऱ्याच गोष्टी सुरु होत्या. मला काही जुन्या गोष्टींची आठवण झाली. तुम्हाला माहिती असेलच मी नेमक्या कोणत्या गोष्टीबद्दल बोलतो आहे. काही वर्षांपूर्वी अशीच एक वाईट घटना घडली होती. जेव्हा मला बाऊन्सर लागला तेव्हा माझ्या डोक्यात पहिल्यांदा त्याच गोष्टीचा विचार आला होता."

टॅग्स :स्टीव्हन स्मिथअ‍ॅशेस 2019आॅस्ट्रेलियाइंग्लंड