Join us  

32 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचे गर्वहरण, ‘जखमी वाघांकडून’ यजमान चारीमुंड्या चीत; भारताचा २-१ ने ऐतिहासिक मालिका विजय

क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते हे देखील जखमी भारतीय वाघांनी चौथ्या आणि अखरेच्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी खरे करून दाखविले. ३२८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने ऑस्ट्रेलियाचा ३ गड्यांनी दणदणीत पराभव केला. कसोटी मालिकाही २-१ अशा फरकाने खिशात घातली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 2:44 AM

Open in App

ब्रिस्बेन : गाबाच्या मैदानात ऑस्ट्रेलियाने ३२ वर्षांत पराभव बघितलेला नाही…ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियममध्ये सलग २८ कसोटी सामने सहज जिंकले…अशा प्रकारच्या फुशारक्या मारणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय युवा ब्रिगेडने जबरदस्त हादरा दिला आणि कांगारूंना चारीमुंड्या चीत केले. अनुभवी आणि दिग्गज खेळाडू जखमी असताना नवख्या चहेऱ्यांनी जिद्दी खेळ करीत ऑस्ट्रेलियाचे ‘गर्वाचे घर खाली’ केले.क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते हे देखील जखमी भारतीय वाघांनी चौथ्या आणि अखरेच्या कसोटी सामन्यात अखेरच्या दिवशी खरे करून दाखविले. ३२८ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने ऑस्ट्रेलियाचा ३ गड्यांनी दणदणीत पराभव केला. कसोटी मालिकाही २-१ अशा फरकाने खिशात घातली. भारताने कालच्या बिनबाद ४ धावांवरून पाचव्या आणि अखेरच्या दिवशी पुढे खेळण्यास सुरुवात केली. विजयासाठी ३२४ धावांची गरज होती. रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात होते; पण वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने रोहित शर्माला ७ धावांवर बाद करीत पहिला धक्का दिला. चेतेश्वर पुजारा आणि गिल यांनी दुसऱ्या गड्यासाठी शतकी (११८) धावांची भागीदारी केली. गिलने कसोटीतील पहिले शतक झळकावण्याची संधी गमावली. तो ९१ धावांवर बाद झाला. कर्णधार अजिंक्य रहाणेने पुजारासोबत धावांचा वेग वाढवला. वेगाने खेळण्याच्या प्रयत्नात २२ चेंडूत एक चौकार आणि एका षटकारासह २४ धावा फटकावून रहाणे बाद झाला; पण तोपर्यंत भारत हा सामना अनिर्णित राखण्यासाठी नव्हे, तर जिंकण्यासाठी खेळणार असल्याचा संदेश ऑस्ट्रेलियाला मिळाला होता. रहाणे बाद झाल्यानंतर  पंतला मयांक अग्रवालच्या आधी संधी देण्यात आली. हा विश्वास सार्थ ठरवून पंतने आक्रमक खेळी करीत पुजारासह ६१ धावांची भागीदारी केली. ७० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला - भारताने ऑस्ट्रेलियाची ३२ वर्षांची मक्तेदारी मोडीत काढून सलग दुसऱ्यांदा त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम केला. गाबा मैदानावर आतापर्यंत २५० पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य कोणत्याही संघाला गाठता आले नव्हते. १९५१ मध्ये वेस्टइंडीजने ऑस्ट्रेलियाविरुद्ध येथे २३६ धावांचे लक्ष्य गाठले होते. मात्र, भारतीय संघाने मंगळवारी ऐतिहासिक विजयासह वेस्ट इंडिजचा ७० वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला आहे.यापेक्षा सरस काहीच नाही : रवि शास्त्रीऑस्ट्रेलियाचा हा दौरा आतापर्यंतचा सर्वांत खडतर दौरा असल्याचे सांगितले. ते म्हणाले,‘हा सर्वांत खडतर दौरा होता. यापेक्षा सरस काहीच नाही. ३६ धावांत बाद झाल्यानंतर हे सर्व अवास्तविक भासत आहे. पराभव मानने आमच्या शब्दकोषात नाही.’बीसीसीआयकडून पाच कोटींचा बोनस -- विजयश्री खेचून आणणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन करताना, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांनी घोषणा करीत पाच कोटींचा बोनस जाहीर केला आहे. या विजयाची कोणत्याही आकड्यामध्ये तुलना करता येणार नाही. - सर्व खेळाडू खूप छान खेळले. हा भन्नाट विजय आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन अशा प्रकारे मालिका विजय मिळविणे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हे कायम लक्षात ठेवलं जाईल, अशा शब्दांमध्ये गांगुली यांनी विजयानंतर आनंद व्यक्त केला.

हा सांघिक कामगिरीचा विजय -“आजचा विजय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. विजयाचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे. संघातील सर्व खेळाडूंचा अभिमान वाटतो. आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करून दाखवायची होती. फलंदाजीसाठी उतरलो तेव्हाच जिंकण्यासाठी खेळायचे हे ठरवले होते. खेळपट्टीवर आम्ही सर्वस्व पणाला लावले. त्यामुळे हा सांघिक कामगिरीचा विजय ठरला”.-अजिंक्य रहाणे, कर्णधार भारत‘फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाद्वारे आमच्याकडे सामन्यात वर्चस्व गाजविण्याची संधी होती; पण आम्ही ती गमावली. सिडनीमध्ये थोडेफार क्षेत्ररक्षणात, तर सोमवारी फलंदाजीमध्ये आमच्याकडून चूक झाली.- टिम पेन, कर्णधार ऑस्ट्रेलिया 

धावफलक -ऑस्ट्रेलिया पहिला डाव: ३६९ धावा. भारत पहिला डाव : ३३६ धावा.ऑस्ट्रेलिया दुसरा डाव : २९४ धावा. भारत दुसरा डाव: रोहित शर्मा झे. पेन गो. कमिन्स ७,४, शुभमन गिल झे. स्मिथ गो. लियोन ९१,चेतेश्वर पुजारा पायचित गो. कमिन्स ५६, अजिंक्य रहाणे झे. पेन गो. कमिन्स २४, ऋषभ पंत नाबाद ८९, मयांक अग्रवाल झे. वेड गो. कमिन्स ९, वॉशिंग्टन सुंदर त्रि. गो. लियोन २२, शार्दुल ठाकूर झे. लियोन गो. हेजलवूड २, नवदीप सैनी नाबाद ००, अवांतर २९, एकूण: ९७ षटकात ७ बाद ३२९ धावा. गडी बाद क्रम: १/१८,२/१३२,३/१६७,४/२२८,५/२६५,६/३१८,७/३२५. गोलंदाजी: स्टार्क १६-० -७५-०, हेजलवुड २२-५-७४-१,कमिन्स २४-१०-५५-४, ग्रीन ३-१-१०-०, लियोन ३१-७-८५-२, लाबुशेन १-०-४-०.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतआॅस्ट्रेलियाक्रिकेट सट्टेबाजीअजिंक्य रहाणे