Australia vs India 3rd Test Match Drawn : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या ५ सामन्यातील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन गाबाच्या मैदानात रंगला होता. सुरुवातीपासून शेवटच्या पाचव्या दिवसापर्यंत पावसाने थांबून थांबून केलेल्या बॅटिंगमुळं अखेर तिसरा सामना अनिर्णित राहिला आहे. चौथ्या दिवसाच्या खेळापर्यंत ऑस्ट्रेलियन संघाला हा सामना जिंकण्याची संधी होती. पण भारतीय संघाच्या दहाव्या क्रमांकाच्या जोडीनं दमदार बॅटिंग करत फॉलोऑन आधी टाळला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात फलंदाजीला बोलवत ८९ धावात ७ विकेट्स घेत सामन्यात ट्विस्ट आणला होता. यापरिस्थितीतही पॅट कमिन्स याने डाव घोषित करून जिंकण्याच्या इराद्याने एक पाऊल पुढे टाकले. पण भारतीय संघ बॅटिंगला आल्यावर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. मग खेळ पुन्हा थांबला. शेवटी हा सामना अनिर्णित राहिल्याची घोषणा झाली.
भारताच्या पहिल्या डावात लोकेश राहुल अन् जड्डूनं केली अर्धशतकी खेळी
ब्रिस्बेनच्या मैदानात चार दिवसाच्या खेळात बॅकफूटवर राहिल्यावर सामना अनिर्णित राहिल्यामुळे टीम इंडियानं एका अर्थाने सामना न जिंकता बाजी मारली आहे. यामागचं कारण भारतीय संघानं ५ सामन्यांच्या मालिकेतील पहिले तिन्ही सामने ऑस्ट्रेलियाच्या बाल्लेकिल्ल्यात खेळले. पर्थी लढाई जिंकून टीम इंडियानं मालिकेची सुरुवात विजयाने केली होती. पिंक बॉल टेस्टमध्ये टीम इंडियाला अपयश आल्यावर ब्रिस्बेनच्या गाबाच्या मैदानातील टेस्टमध्ये बेस्ट कामगिरी करण्याचे मोठे चॅलेंज टीम इंडियासमोर होते. हा सामना ऑस्ट्रेलियाकडे झुकलाही होता. पण चौथ्या दिवसातील अखेरचं सेशनमध्ये सामन्यात ट्विस्ट आला. जसप्रीत बुमराह आणि आकाशदीपनं कलेल्या चिवट आणि जिगरबाज खेळीमुळे चौथ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाचे मनसुबे सहज शक्य होणार नाहीत, याचे संकेत मिळाले. त्यात पाऊस झाला अन् तीन सामन्यानंतर भारतीय संघानं मालिका १-१ अशी बरोबरी ठेवली. हे टीम इंडियाचं मोठं यशच आहे.
मेलबर्न अन सिडनीत तरी फलंदाजी बहरणार का?
पहिल्या तिन्ही कसोटी सामन्यात भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसले. ब्रिस्बेन कसोटी सामन्यात लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी केलेली अर्धशतकी खेळी टीम इंडियासाठी मोलाची ठरली. आता भारतीय संघ चौथा आणि पाचवा कसोटी सामना अनुक्रमे मेलबर्न आणि सिडनीच्या मैदानात खेळणार आहे. या दोन्ही मैदानात बॅटिंगला स्कोप असल्यामुळे इथं भारतीय फंलदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.