Join us  

'सचिनने मला 'तो' प्रश्न विचारला अन् माझी झोपच उडाली'; रणवीरने सांगितला 83 च्या शूटिंगचा किस्सा

83 चित्रपटात अभिनेता रणवीर सिंग हा विश्वविजेता कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारतो आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 8:38 PM

Open in App

भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी अभिमानाचा क्षण म्हणजे कपिल देव यांनी १९८३ साली लॉर्ड्सच्या मैदानावर उंचावलेला विश्वचषक. हेच क्षण चित्रपटाच्या रूपात आता साऱ्यांना पाहता येणार आहेत. २४ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यात बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग याने कपिल देव यांची मुख्य भूमिका साकारली आहे. कपिल देव यांचा अभिनय करणं हे फारसं सोपं नसल्याचं वेळोवेळी रणवीरने सांगितलं आहेच. पण त्यासोबतच, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सचिन तेंडुलकरसोबतचा एक किस्सा सांगितला.

"या चित्रपटात सर्वात कठीण होतं ते म्हणजे कपिल देव यांच्या गोलंदाजीची नक्कल करणं. मला ते खूप वेळ जमतंच नव्हतं. तब्बल सात महिने दिवसातून ४-४ तास मी त्यांच्यासारखी गोलंदाजी करण्याचा सराव करायचो. त्यांच्यासारखी नक्कल करताना माझ्या अभिनयाचा कस लागला. त्यातच सचिन तेंडुलकर मला शूटिंगदरम्यान भेटला आणि त्याने मला प्रश्न विचारला की तू त्यांच्या गोलंदाजीची नक्कल कशी करणारेस?. सचिनच्या त्या प्रश्नाने माझी झोपच उडाली. जो कोणी भेटायचा तो मला कपिल देव यांच्या गोलंदाजीची नक्कल कशी करणार हेच विचारायचा आणि तेच सर्वात कठीण होतं", असं रणवीर म्हणाला.

"आम्ही लॉर्ड्सच्या मैदानावर होतो. त्यावेळी पाऊस पडला. नंतर मी आणि कबीर सर मैदानात होतो. त्यावेली आम्ही सचिनला भेटलो. तो मला पाहून म्हणाला, '83 मध्ये तू मुख्य भूमिका करणार आहेस ना.. चांगलं आहे. पण तू त्यांच्यासारखी गोलंदाजी पण करणार आहेस का.. तसं असेल तर खूपच छान! सचिन तसं बोलला. त्यानंतर खूप जणांनी मला गोलंदाजीच्या नकलेबद्दल विचारलं. प्रत्येकाच्या बोलण्याचा किंवा विचारण्याचा सूर एकच होता की त्यांच्या गोलंदाजीची नक्कल करणं सोपं नाही. आणि ते खरंच होतं. अनेक महिने मला त्या गोष्टीचा सराव करूनही नक्कल जमत नव्हती. पण अखेर मी कसंबसं निभावून नेलं", असं रणवीर म्हणाला. 

टॅग्स :८३ सिनेमारणवीर सिंगसचिन तेंडुलकरकपिल देव
Open in App