इच्छा तिथे मार्ग! अफगाणिस्तान संघाने हे सिद्ध करून दाखवलं. एका रेफ्युजी कॅम्पमधून अफगाणिस्तानच्या क्रिकेटला सुरुवात झाली आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतानंतर सर्वोत्तम कामगिरी करणारा तो आशियाई संघ ठरला आहे. २०१५ व २०१९ च्या वर्ल्ड कपमध्ये केवळ एक विजय मिळवणाऱ्या या संघाने यंदा भारतात ४ विजय मिळवले आणि २०२५ मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही पत्र ठरले. आता जर तुम्ही वर्ल्ड कप स्पर्धेची गुणतालिका पाहाल, बांगलादेश, श्रीलंका आणि इंग्लंड यांना अफगाणिस्तानने मागे टाकलेले दिसेल.... ही अफगाणसाठी खूप मोठी गोष्ट आहे.
२००३ च्या वर्ल्ड कपमध्ये केनियाने उपांत्य फेरीत प्रवेश करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. आता केनिया क्रिकेट विश्वात ताठ मानेने इतरांना टक्कर देईल असे वाटले होते, परंतु ते यश क्रिकेटच्या भाषेत फ्लुक ( तुक्का) होते. बांगलादेशने तेव्हा विंडीजविरुद्ध मान टाकली अन् न्यूझीलंडने केनियात खेळण्यात नकार दिला. त्यामुळे हा चमत्कार घडला. पण, अफगाणिस्तानसाठी 'कुदरत का निजाम' वगैरे काहीच आले नाही... जे आहे ते आपल्या मनगटांच्या जोरावर... अफगाणिस्तानने हा वर्ल्ड कप खऱ्या अर्थाने गाजवला. इंग्लंड, पाकिस्तान व श्रीलंका या माजी वर्ल्ड कप विजेत्या संघांना त्यांनी पाणी पाजले. पाच वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाच्या तोंडाला फेस आणला होता. ९१ धावांवर ७ फलंदाज त्यांनी माघारी पाठवले होते, ग्लेन मॅक्सवेल उभा राहिला नसता तर हाही एक धक्कादायक निकाल झाला असता अन् कोण जाणे अफगाणिस्तान भारताविरुद्ध उपांत्य फेरीत दिसला असता...
सोव्हिएत आक्रमणानंतरच्या काळात क्रिकेटची अफगाणिस्तानसोबत ओळख झाली. तेव्हा अफगाणिस्तानचे बरीच जणं पाकिस्तानातील रेफ्युजी कॅम्पमध्ये होती आणि तिथे त्यांना क्रिकेट माहित झाले. १९व्या दशकात ब्रिटीशर्स अफगाणिस्तानात क्रिकेट खेळले होते, परंतु १९९०मध्ये जेव्हा पाकिस्तानात रेफ्युजी कॅम्प लागला तेव्हा हा खेळ अफगाण लोकांमध्ये प्रसिद्ध झाला. पाकिस्तानमध्ये तेव्हा क्रिकेट खूपच गाजलं होतं आणि पेशावर येथे रेफ्युजी कॅम्प लागला होता. साल २०००च्या सुरुवातीला अफगाणी त्यांच्या घरी परतायला सुरुवात झाली होती आणि तिथे ते क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अफगाणिस्तानचे काही खेळाडू पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्येही खेळले..
पण, २००९मध्ये याच कामगिरीच्या जोरावर त्यांना वन डे आंतरराष्ट्रीय संघाचा दर्जा मिळाला. ८ वर्षांत त्यांनी घेतलेली ही मोठी झेप होती. २०१०मध्ये त्यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची पात्रता निश्चित केली आणि हा त्यांच्यासाठी क्रांतिकारक दिवस ठरला. त्यांना भले या स्पर्धेत यश मिळालं नसलं तरी तो अनुभव त्यांनी गाठीशी बांधला अन् पुढच्या आव्हानांसाठी सज्ज झाले. पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया सारख्या तगड्या संघांविरुद्ध ते खेळू लागले. २०१३ साली ते आयसीसी संलग्न ते सहयोगी सदस्य झाले. २०११चा वर्ल्ड कप खेळण्याची संधी तेव्हा थोडक्यात हुकली होती, परंतु मोहम्मद नबीच्या नेतृत्वाखाली त्यांनी ICC World Cricket League Championship मध्ये दुसरे स्थान पटकावून २०१५च्या वर्ल्ड कपचे तिकिट पटकावले. त्यात त्यांनी स्कॉटलंडविरुद्ध एकमेव विजय मिळवून इतिहास घडवला.
२०१७ला त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालं आणि आयसीसीने त्यांना पूर्ण सदस्यत्व दिले, शिवाय कसोटी खेळणाऱ्या देशाचा दर्जाही त्यांनी मिळवला. पण, त्यांच्यासमोरील आव्हानं इथेच संपलेली नव्हती... देशात तालिबानींचे राज्य, क्रिकेटसाठी अपुऱ्या सोयी सुविधा.. यासाठी कोणताच देश त्यांच्याकडे खेळण्यासाठी जात नाही. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया जाणार होते, परंतु तालिबान्यांनी महिला क्रिकेट बंद केल्याच्या निषेधार्त ऑसींनी दौरा रद्द केला.. म्हणूनच वर्ल्ड कपच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीपूर्वी नवीन उल हकने ऑस्ट्रेलियावर निशाणा साधला होता. तालिबान्यांकडे अफगाणिस्तान क्रिकेट संघटनेची सूत्रही गेली होती आणि त्यांच्या वर्ल्ड कप खेळण्यावरही प्रश्नचिन्ह होते. पण, राशीद खान, नबी यांच्यासह अफगाणिस्तान क्रिकेटची प्रसिद्धी एवढी झाली आहे की तालिबान्यांना विरोध करणे धोक्याचे वाटले असावे...
तुर्तास त्यांना Thank You म्हणून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायला हव्यात...