RCB Victory Celebration: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने तब्बल १८ वर्षानंतर पहिल्यांदाच आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. आयपीएल २०२५ मध्ये आरसीबीचा संघ चॅम्पियन ठरला आहे. मंगळवारी रात्री अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा सहा धावांनी पराभव केला. आरसीबीने १८ वर्षांनी ट्रॉफी जिंकल्यानंतर देशभरात संघाच्या चाहत्यांकडून एकच जल्लोष सुरु झाला होता. बंगळुरूच्या अनेक भागातील रस्ते उत्साही चाहत्यांनी भरले होते. अनेक ठिकाणी लोकांनी नाचत, गाणी गात आणि फटाकेही फोडले. मात्र कर्नाटकात या विजयोत्सवाला गालबोट लागलं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयानंतर मंगळवारी रात्री देशभरात जल्लोष करण्यात आला. कर्नाटकातील शिवमोगा येथेही आरसीबीच्या चाहत्यांनी त्यांचा आनंद साजरा केला. मात्र हा आनंदोत्सव साजरा करताना दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. २१ वर्षीय अभिनंदनने या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बाईक रॅलीमध्ये भाग घेतला होता. पण या रॅलीमध्ये दोन बाईक समोरासमोर धडकल्या आणि अभिनंदनचा जागीच मृत्यू झाला.
अभिनंदन हा व्यंकटेशन नगर येथे राहत होता. बाईक रॅली जयनगर पोलीस स्टेशन परिसरातील गणपती मंदिरासमोर पोहोचताच दोन बाईकची जोरदार धडक झाली. या अपघातात अभिनंदन गंभीर जखमी झाला. अभिनंदनचे मित्र मदतीसाठी त्याच्याकडे धावले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अभिनंदनला रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अभिनंदनच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दुसरीकडे, या बाईक रॅलीमुळे आणखी एक अपघाताची घटना घडली. बाईक रॅली दुर्गीगुडी येथे असताना रात्रीच्या अंधारात एका घरासमोर उभ्या असलेल्या कारला एका बाईकने जोरदार धडक दिली. यानंतर, बाईकवरील लोक तेथून पळून गेले. यामध्ये कारचे नुकसान झाले. सेलिब्रेशनसाठी रात्री उशिरापर्यंत लोक सीनाप्पा शेट्टी सर्कल येथेही जमले होते. यावेळी गोंधळ घालणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.