Josh Hazlewood Australia, IND vs AUS 3rd Test: ब्रिसबेन गाबा स्टेडियममध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत चौथ्या दिवसअखेर भारतीय संघाने ९ बाद २५२ धावा केल्या. केएल राहुल (८४) आणि रविंद्र जाडेजा (७७) वगळता वरच्या आणि मधल्या फळीतील एकाही फलंदाजाने जबाबदारी ओळखून खेळ केला नाही. दिवसाचा खेळ संपेपर्यंत शेवटच्या विकेटसाठी आकाश दीप (नाबाद २७) आणि जसप्रीत बुमराह (नाबाद १०) यांनी नाबाद ३९ धावांची भागीदारी करत फॉलोऑन वाचवला. अखेर अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे खेळ थांबवण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. पण त्यांना एक मोठा धक्का बसला. स्टार गोलंदाज जोश हेजलवूडला दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून माघार घ्यावी लागल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिली.
जोश हेजलवूड दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीला मुकला होता. पण त्यानंतर त्याला तिसऱ्या कसोटीत संधी देण्यात आली. त्याला फारशी गोलंदाजी करता आली नाही. आज चौथ्या दिवशी तर त्याने केवळ एक षटक टाकले आणि त्यानंतर त्याच्या उजव्या पायाच्या पोटरीला दुखापत झाली. त्यामुळे त्याला उर्वरित मालिकेला मुकावे लागणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. दुखापतनंतर आज मॅच ब्रेकमध्ये त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले. त्यामुळे तो गोलंदाजीसाठी पुन्हा मैदानात उतरलाच नाही.
दरम्यान, भारतीय संघाच्या पहिल्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली. यशस्वी जैस्वाल (४), शुबमन गिल (१), विराट कोहली (३) आणि रिषभ पंत (९) संघाच्या पन्नाशीच्या आधीच तंबूत परतले. चौथ्या दिवशी रोहित शर्माही (१०) स्वस्तात बाद झाला. केएल राहुल (८४) आणि रवींद्र जाडेजा (७७) या दोघांनी संघाला द्विशतकी मजल मारण्यात मोलाचा वाटा उचलला. नितीश कुमार रेड्डीने (१६) चांगली झुंज दिली. त्यानंतर आकाश दीप (२७) आणि जसप्रीत बुमराह (१०) या दोघांनी नाबाद राहत भारताला २५०+ धावा करून दिल्या.
त्याआधी ऑस्ट्रेलियन संघाने मात्र भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ट्रेव्हिस हेड (१५२), स्टीव्ह स्मिथ (१०१) यांची शतके आणि अलेक्स कॅरीच्या (७०) अर्धशतकाच्या बळावर ४४५ धावा केल्या. या डावात बुमराह वगळता इतर कोणत्याही गोलंदाजाला आपली छाप पाडता आली नाही.
Web Title: Big Blow to Australia as Josh Hazlewood appears set to miss the rest of the AUS vs IND Test series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.