सिडनी - ऑस्ट्रलियाचा माजी जलदगती गोलंदाज मिचेल जॉन्सनने बिग बॅश लीगमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र, जगभरात होणा-या अन्य टी-20 मालिकेसाठी आपण उपलब्ध असणार असल्याचे त्याने सांगितले.
बिग बॅश लीगमध्ये जॉन्सन पर्थ स्कॉचर्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. 2018-19च्या लीगला डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे आणि प्रत्येक संघाला होम-अवे अशा फॉरमॅटमध्ये एकूण 14 सामने खेळावे लागणार आहेत. " स्पर्धा कालावधी वाढल्यामुळे त्यात खेळणे मला शक्य नाही. 37 वर्षांच्या खेळाडूला दीर्घ लीग खेळणे शारीरिकदृष्ट्या जमणारे नाही, " अशी प्रतिक्रिया जॉन्सनने दिली.
संयुक्त अरब अमिराती येथे होणा-या पहिल्याच टी-20 लीगसाठी जॉन्सनने त्याचे नाव सुचविले आहे आणि तो टी -10 लीगमध्येही खेळण्याची शक्यता आहे. बिग बॅश लीगच्या 19 सामन्यांत त्याने 20 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने एकूण 112 टी-20 सामन्यांत 25.78च्या सरासरीने 123 विकेट घेतल्या आहेत.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ऑस्ट्रेलियाकडून खेळताना त्याने 73 कसोटीत 313, 153 वन डेत 239 आणि 30 टी-20 सामन्यांत 38 विकेट्स घेतल्या आहेत.