Bhuvneshwar Kumar cute family photo : भारतीय संघात कायम नवे खेळाडू येत असतात आणि आपली वेगळी छाप उमटवताना दिसतात. असाच एक खेळाडू म्हणजे भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार. त्याने आपल्या स्विंग गोलंदाजीच्या बळावर एक काळ गाजवला. आपल्या कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर त्याने पाकिस्तानी सलामीवीराचा उडवलेला त्रिफळा साऱ्यांना आजही लक्षात आहे. काही दिवसांपूर्वी IPL मध्ये भुवीला सनरायजर्स हैदराबाद संघाने रिलीज केले. त्यानंतर RCB ने त्याला तब्बल १०.७५ कोटींच्या बोलीवर ताफ्यात घेतले. पण सध्या मात्र तो एका वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. ते कारण म्हणजे त्याचा गोड फॅमिली फोटो.
भुवनेश्वर कुमारने २०१७ मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण नुपूर नागर (Nupur Nagar) हिच्याशी लग्न केले. नुपूर ही व्यवसायाने इंजिनियर असून नोएडा येथील एका कंपनीत काम करते. तो आणि नुपूर लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते, पण आई-वडिलांना याबद्दल सांगण्याची हिंमत त्यांनी सुरुवातीला झाली नव्हती. नुपूर आणि भुवनेश्वर मेरठमध्ये एकमेकांचे शेजारी होते. दोघांचेही वडील पोलिस इन्स्पेक्टर पदावर होते. त्यामुळे दोघांच्याही घरात दरारा आणि शिस्तीचे वातावरण होते. पण अखेर दोघांनी धाडस करून घरी सांगितले आणि मग त्यांचे लग्न लावून देण्यात आले. या दोघांना २०२१ मध्ये एक गोड मुलगी झाली. अक्सा (Acsah) असं या चिमुरडीचे गोड नाव आहे. त्यांच्यासोबतचे फोटो भुवनेश्वरने शेअर केले आहेत. तसेच, माझं कुटुंब हेच माझ्यासाठी जग आहे, माझं सर्वस्व आहे, असेही त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
दरम्यान, IPL 2025 च्या लिलावात अनेक बड्या खेळाडूंवर बोली लागली तर काही बडे खेळाडू आश्चर्यकारकरित्या अनसोल्ड राहिले. पण एका खेळाडूने लक्ष वेधून घेतले. तो खेळाडू म्हणजे भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला मेगा लिलावात तब्बल १० कोटी ७५ लाखांच्या मोठ्या बोलीसह खरेदी केले. फ्रँचायझी या खेळाडूला खरेदी करण्यासाठी खूपच उत्सुक दिसली. म्हणूनच आता त्याच्याबद्दल एक चर्चादेखील रंगली आहे. आगामी हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा कर्णधार असू शकतो, असे बोलले जात आहे. फ्रँचायझी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला कर्णधार बनवण्याचा विचार करत असल्याचं दिसत आहे.