Join us  

Ben Stokes: "वनडे क्रिकेट हे केवळ 40 षटकांचेच असावे", बेन स्टोक्सने ICC ला दिला सल्ला

सध्या क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 6:36 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्या क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकामुळे (Busy Schedule) खेळाडूंमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटचे सामने कसे खेळवायचे हे मोठे आव्हान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेसमोर (ICC) आहे. कारण टी-20 क्रिकेटच्या लोकप्रियतेपासून एकदिवसीय क्रिकेटच्या लोकप्रियतेत थोडीशी घट झाली आहे. भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने फार पूर्वीच एकदिवसीय सामने मनोरंजक बनवण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्याचे सुचवले होते. आता इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes), ज्याने नुकतीच एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे त्यानेही असेच काहीसे म्हटले आहे. 

इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेट केवळ 40 षटकांचे असायला हवे असे म्हटले आहे. "द हंड्रेडच्या रूपाने इंग्लंडमध्ये एक पूर्णपणे वेगळा फॉरमॅट तयार झाला आहे आणि तो ही टी-२० मध्ये सुरू आहे. ही विचार करण्याची बाब आहे. 50 षटकांचा सामना 40 षटकांचा होऊ शकतो हे माझे वैयक्तिक मत आहे. खूप जास्त क्रिकेट खेळले जात आहे आणि हे तिन्ही फॉरमॅट कायम ठेवण्याचा हा एक मार्ग असू शकतो. मला वाटतं की जर आपण एकदिवसीय सामने 50 ऐवजी 40 षटकांपर्यंत ठेवले तर यावर उपाय निघू शकतो", असे स्टोक्सने अधिक म्हटले. 

IPL मध्ये खेळल्याचा चांगला अनुभव - स्टोक्स 

दरम्यान, 2023 मध्ये होणाऱ्या आयपीएलच्या हंगामात आपला सहभाग राष्ट्रीय संघाच्या वेळापत्रकावर अवलंबून असेल असेही स्टोक्सने म्हटले. त्याने म्हटले, "मला हे स्पष्ट करायचे आहे की माझ्यासाठी कसोटी क्रिकेट सर्वोपरी आहे. त्यामुळे माझे सर्व निर्णय कसोटी वेळापत्रकावर अवलंबून असतील. आयपीएलमध्ये सहभागी झाल्याचा अनुभव चांगला आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे आयपीएलच्या वेळापत्रकाचाही विचार करावा लागेल. इंग्लंडचे क्रिकेटपटू म्हणून आमचे वेळापत्रक खूप व्यस्त असते आम्ही वर्षभर क्रिकेट खेळत असतो", अशा शब्दांत स्टोक्सने ईसीबीला देखील टोला लगावला आहे. 

 

टॅग्स :बेन स्टोक्सआयसीसीइंग्लंडआयपीएल २०२२टी-20 क्रिकेटइंडियन प्रीमिअर लीग
Open in App