भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) आज ट्रेंडिंगमध्ये आहे... स्फोटक फलंदाजाने भारतीय संघाच्या जर्सीवर INDIA याऐवजी Bharat असे लिहिले जावे अशी विनंती बीसीसीआयकडे केली. सत्ताधारी भाजपा पक्षाने पाच दिवसीय विशेष अधिवेशन बोलावले आहे आणि त्यात INDIA हे नाव बदलून भारत असे केले जाईल, अशी सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. त्यालाच आधारून वीरूने BCCI कडे ही मागणी केली. त्यावरून वीरूला एका युजरने राजकारणात जॉईन होण्याचा सल्ला दिला. यावेळी त्याने गौतम गंभीरच्या आधी तू राजकारणात यायला हवं होतंस, असे वीरूसाठी लिहीले. त्यावर वीरूने अप्रत्यक्षपणे गंभीरला टोला लगावला.
![]()
त्याने लिहिले की,''मला राजकारणात अजिबात रस नाही. गेल्या दोन निवडणुकांमध्ये दोन्ही प्रमुख पक्षांशी संपर्क साधला होता. माझे मत असे आहे की मनोरंजन करणार्यांनी किंवा खेळाडूंनी राजकारणात येऊ नये कारण बहुतेक ते त्यांच्या स्वतःच्या अहंकारासाठी आणि सत्तेची भूक असल्याने येतात. लोकांसाठी क्वचितच खरा वेळ देतात, काही अपवाद आहेत, परंतु सामान्यतः बहुतेक फक्त PR करतात. मला क्रिकेटमध्ये गुंतून राहणे आणि समालोचन करणे आवडते. सोयीस्कर असेल तेव्हा अर्धवेळ खासदार होण्याची इच्छा मी कधाच बाळगली नाही.''
राजधानी दिल्लीत जी-20 परिषद होणार आहे. याच्या निमंत्रण पत्रिकेवरुन नवीन वाद सुरू झाला आहे. या पत्रिकेवर देशाचा उल्लेख इंडियाऐवजी भारत केला आहे. त्यामुळे आता आपल्या देशाचे नाव 'इंडिया'ऐवजी 'भारत' करण्याची चर्चा सुरू झाली आहे. वीरूने याआधी ट्विट केले होते की, माझा नेहमीच विश्वास आहे की, नाव असे असावे, त्यामुळे आपल्याला अभिमान वाटेल. आम्ही भारतीय आहोत. इंडिया नाव इंग्रजांनी दिले होते, आपले मूळ नाव 'भारत' परत मिळण्यास बराच काळ लागला आहे. मी बीसीसीआय आणि जय शहा यांना विनंती कतो की, भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर 'इंडिया' ऐवजी 'भारत' लिहावे.