Bee Attack: क्रिकेट सामन्यादरम्यान मधमाश्यांचा हल्ला, खेळाडू जखमी, तर गंभीर जखमी झालेल्या पंचांचा मृत्यू

Bee Attack Uttar Pradesh News:

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 10:32 IST2026-02-19T10:28:47+5:302026-02-19T10:32:13+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Bee attack during cricket match, players injured, umpire dies after being seriously injured | Bee Attack: क्रिकेट सामन्यादरम्यान मधमाश्यांचा हल्ला, खेळाडू जखमी, तर गंभीर जखमी झालेल्या पंचांचा मृत्यू

Bee Attack: क्रिकेट सामन्यादरम्यान मधमाश्यांचा हल्ला, खेळाडू जखमी, तर गंभीर जखमी झालेल्या पंचांचा मृत्यू

क्रिकेटच्या सामन्यादरम्यान, मधमाश्यांच्या मोहोळाने केलेल्या हल्ल्यात अनेक खेळाडू जखमी तर गंभीर जखमी झालेल्या पंचांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील शुक्लागंज येथे घडली आहे. शुक्लागंज येथील सप्रू स्टेडियममध्ये १३ वर्षांखालील मुलांचा क्रिकेट सामना सुरू असताना मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात मैदानावर असलेले अनेक खेळाडू जखमी झाले. तर पंच माणिक गुप्ता हे गंभीर जखमी झाले. गुप्ता यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सप्रू स्टेडियममध्ये एचए अॅकॅडमी आणि एसबीएस अॅकॅडमी यांच्यादरम्यान १३ वर्षांखालील मुलांचा क्रिकेट सामना खेळला जात होता. हा सामना सुरू असतानाच अचानक मधमाश्यांचं मोहोळ मैदानाच्या दिशेने आलं. तसेच या मधमाश्यांच्या मोहोळाने मैदानातील खेळाडू आणि पंचांवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मैदानात गोंधळ उडाला. खेळाडू आणि प्रेक्षक हल्ल्यापासून वाचण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. याचदरम्यान, सामन्यात पंच म्हणून काम पाहत असलेले माणिक गुप्ता हे या मधमाश्यांच्या तावडीत सापडले. मधमाश्यांनी मारलेल्या डंखामुळे ते गंभीर जखमी झाले. मैदानावर असलेले दुसरे पंच जगदीश शर्मा आणि काही खेळाडूही मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झाले.

या घटनेनंतर आयोजक आणि स्थानिकांच्या मदतीने जखणींना शुक्लागंज येथील दोन खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर माणिक गुप्ता यांची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने त्यांना प्राथमिक उपचारांनंतर कानपूरमधील हॅलेट रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान, त्यांची प्राणज्योत मालवली.  

Web Title: Bee attack during cricket match, players injured, umpire dies after being seriously injured