मुंबई : भारतीय क्रिकेटच्या मानगुटीवर बसलेले मॅच फिक्सिंगचे भूत काही केल्या उतरण्याचे नाव घेत नाही. मॅच फिक्सिंग प्रकरणात अनेक क्रिकेटपटूंवर कठोर कारवाई झाल्याचा इतिहास समोर असतानाही वारंवार असे प्रयत्न केले जात आहेत. मॅच फिक्सिंगचे प्रकार रोखण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची स्थापना केली आहे. तरीही फिक्सर्सकडून नवनवीन मार्गांनी मॅच फिक्स करण्याचे प्रयत्न सुरूच आहे. भारतीय खेळाडूंना काही अज्ञात इसमांनी व्हॉट्सअॅप मॅसेजद्वारे मॅच फिक्सिंगसाठी विचारणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीसीसीआयकडून या प्रकरणाचा तपासही सुरू झाला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या तामीळनाडू प्रीमिअर लीगमधील हा प्रकार आहे. फ्रँचायझीतील काही खेळाडूंना मॅच फिक्सिंगसाठी अज्ञात इसमांनी व्हॉट्सअॅपद्वारे विचारणा केल्याची माहिती बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दिली आहे. त्यांनी या प्रकरणाचा तपासही सुरू केला आहे.
बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख अजित सिंग यांनी सांगितले की,''अज्ञात इसमांकडून व्हॉट्सअॅप मॅसेज येत असल्याची तक्रार काही खेळाडूंनी आमच्याकडे केली आहे. ते क्रमांक कोणाचा आहे याचा आम्ही शोध घेत आहोत. या संबंधीत आम्ही खेळाडूंचाही जबाब नोंदवला आहे.''