काश्मीर प्रीमिअर लीगवरून (Kashmir Premier League) नवा वाद सुरू झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) या लीगला विरोध केला असून आयसीसीडे या लीगला मान्यता देऊ नये अशी विनंती केली आहे. बीसीसीआयच्या या पवित्र्याविरोधात पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) यानं निशाणा साधला.
बीसीसीआय या लीगला विरोध करून पाकिस्तानसोबत राजकीय अजेंडा राबवत आहे. मला या लीगमध्ये न खेळण्याची धमकी दिली जात आहे. या लीगमध्ये खेळल्यास भारतात क्रिकेटसंबंधी कोणत्याच गोष्टींसाठी येऊ देणार नाही, अशी धमकी दिली जातेय, असे ट्वीट दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हर्षेल गिब्स यानं केलं होतं.
त्यावर आफ्रिदीनं प्रतिक्रिया दिली, की, ''बीसीसीआय पुन्हा एकदा क्रिकेट आणि राजकारण एकत्र आणत आहेत. काश्मीर प्रीमियर लीग काश्मीर, पाकिस्तान आणि जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांसाठी आहे. अशा प्रकारामुळे अजिबात विचलित होणार नाही.''
काश्मीर प्रीमियर लीगमध्ये हर्षल गिब्ज, तिलकरत्ने दिलशान, मॉन्टी पानेसार यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळणार आहेत. पण पानेसारनं बीसीसीआयच्या विरोधानंतर माघार घेतली आहे. ओवरसीज वॉरियर्स, मुजफ्फराबाद टायगर्स, रावळकोट हॉक्स, बाग स्टालियन, मीरपूर रॉयल्स आणि कोटली लायन्स या 6 टीम्समध्ये ही लीग खेळवली जाणार आहे.
बीसीसीआयचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सडेतोड उत्तर
भारतातील क्रिकेटमध्ये कोणताही निर्णय घेण्याचा हक्क हा केवळ बीसीसीआयचा आहे, हे पाकिस्तान क्रिकेट मंडळाला कदाचित माहित नसावा किंवा ते संभ्रमात पडले असावेत. ''मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली ज्याची CBI चौकशी करत आहे. त्यानं केलेलं विधान हे खरं की खोटं याबाबत कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. समजा गिब्सचं विधान खरं असल्याचे आपण गृहीत धरून चाललो, तरी भारतातील क्रिकेटबद्दल कोणताही निर्णय घ्यायचा हक्क हा बीसीसीआयचा आहे,''असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं ANI ला सांगितले.