Join us

... तर भारत वर्ल्ड कपमध्ये पाकविरुद्ध खेळणार नाही - बीसीसीआय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही ( बीसीसीआय) पाकविरुद्ध सामन्याबद्दल मोठं विधान केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 10:42 IST

Open in App
ठळक मुद्देपुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झालेवर्ल्ड कप स्पर्धेतील भारताने पाकविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याची मागणी

मुंबई : पाकिस्तानातून दहशतवाद्यांना मिळत असलेले सहकार्य आणि त्यामुळे भारतावर सतत होणारे हल्ले यामुळे शेजारील राष्ट्राविरोधात देशात संतापाचे वातावरण आहेच. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर त्या संतापात अधिक भर पडली. त्यामुळे पाकिस्तानला जशासतसे उत्तर देण्याची भाषा देशवासीय करत आहेत. पाकिस्तानशी कोणतेही संबंध ठेवू नका, मग ते राजकीय असो, आर्थिक असो किंवा खेळाच्या मैदानावरील असो. पाकला धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ असल्याची भावना देशवासीयांत आहे. त्यामुळेच इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही ( बीसीसीआय) पाकविरुद्ध सामन्याबद्दल मोठं विधान केलं आहे.14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही आणि दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले जाईल, असा निर्धार व्यक्त केला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी क्रिकेटच्या माध्यमाचा नेहमी वापर करण्यात आला, परंतु त्यानंतरही पाककडून कुरापत्या सुरूच राहिल्या. मुंबईवरील 26/11च्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील क्रिकेट मालिका पूर्णपणे बंद झाल्या. केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या व आशिया चषक स्पर्धेत उभय संघ एकमेकांविरुद्ध खेळत आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर तेथेही खेळण्याची गरज नाही अशी मागणी भारतात जोर धरत आहे. त्यावर बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की,'' वर्ल्ड कप स्पर्धा नजीक आल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. या प्रकरणात आयसीसी काहीच करू शकत नाही. भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, असे सरकारला वाटत असेल तर आम्ही सामन्यावर बहिष्कार घालू.''त्यांनी पुढे सांगितले की,'' जर आम्ही खेळलो नाही, तर पाकिस्तानला गुण मिळतील आणि जर अंतिम सामन्यात पुन्हा ते समोर आले, तर त्यांना न खेळताच वर्ल्ड कप मिळेल. याबाबत आम्ही अद्याप आयसीसीसोबत संवाद साधलेला नाही.''दरम्यान,  भारताचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग यानेही वर्ल्ड कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळू नका अशी मागणी केली आहे. देश महत्त्वाचा आहे, क्रिकेट नंतर, असे मत भज्जीनं व्यक्त केलं आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानआयसीसीआयसीसी विश्वकप २०१९बीसीसीआयपुलवामा दहशतवादी हल्ला