आशिया कप स्पर्धेवर घोंगावणारे संकटाचे सावट दूर होताना दिसत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आगामी आशिया कप टी-२० स्पर्धा युएईच्या मैदानात आयोजित करण्यासाठी तयार असल्याची माहिती समोर येत आहे. बीसीसीआयच्या या भूमिकेनंतर लवकरच आशिया कप स्पर्धेसंदर्भातील अधिकृत घोषणा होईल, अशी अपेक्षा आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
BCCI युएईच्या मैदानात स्पर्धा पार पाडण्यास तयार बांगलादेश येथील ढाका येथे गुरुवारी आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वच्या सर्व २५ सदस्यांनी भाग घेतला होता. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला वर्चुअली या बैठकीत सामील झाले होते. पीटीआयने ACC सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, " बीसीसीआय युएईमध्ये आशिया कप स्पर्धेच्या आयोजनासाठी तयार आहे. भारतीय संघ या स्पर्धेतील आपले सर्व सामने दुबईत खेळण्याची शक्यता आहे. आशिया कप स्पर्धातील कार्यक्रमावर अजूनही चर्चा सुरु आहे."
लवकरच अधिकृत माहिती समोर येईल
आशिया कप स्पर्धेसंदर्भात बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, " बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीला उपस्थितीत होते. त्यांनी सदस्यीय क्रिकेट बोर्डासमोर आपली भूमिका मांडली आहे. बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भात येणाऱ्या बातम्यांवर आताच काही बोलणार नाही. काही दिवसांतच अधिकृतरित्या यासंदर्भातील सविस्तर माहिती समोर येईल."
भारत-पाक सामना होणार का? ACC अध्यक्षांना प्रश्न, पण.... या बैठकीनंतर आशियाई क्रिकेट परिषद आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना या स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील सामन्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. पण त्यांनी या मुद्द्यावर मौनच बाळगणे पसंत केले. प्रसारमाध्यमांशी संवाद सांधताना नक्वी म्हणाले की, आम्ही बीसीसीआयसोबत चर्चा केली होती. काही मुद्यांवरील तोडगा लकवरच निघेल. सर्व २५ सदस्य या बैठकीला उपस्थितीत होते, असे त्यांनी सांगितले आहे.
BCCI चा दबाव अन्....
ढाका येथे आयोजित आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत एकूण १० मुद्यांवर चर्चा अपेक्षित होती. पण बीसीसीआयच्या दबावामुळे फक्त दोन मुद्द्यांवरच चर्चा झाली, अशीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे खरंच तोडगा निघलाय का? जर स्पर्धेसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असेल तर अधिकृतरित्या याची घोषणा कधी होणार? असे प्रश्न आता उपस्थितीत होत आहेत.