नवी दिल्ली - धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर क्रिकेट विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या आणि कुशल कप्तानीच्या जोरावर भारतीय संघाला अव्वल स्थानावर पोहोचवणाऱ्या विराट कोहलीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला जाण्याची शक्यता आहे. भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी बीसीसीआयने विराट कोहलीच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे स्पोर्टस् अॅवार्ड कमिटीच्या बैठकीत विराटच्या नावावर मोहोर उमटल्यास त्याला हा सर्वोच्च सन्मान मिळू शकतो.
राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराची सुरुवात 1991 साली झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत हा सन्मान 34 खेळाडूंना देण्यात आला आहे. मात्र आजमितीस केवळ सचिन तेंडुलकर आणि महेंद्र सिंह धोनी या दोन क्रिकेटपटूंनाच हा पुरस्कार मिळाला आहे. सचिन तेंडुलकरला 1997-98 य वर्षासाठी आणि महेंद्रसिंह धोनीला 2007 या वर्षासाठी हा सन्मान मिळाला होता.  आता विराट कोहलीच्या नावावर मोहोर उमटल्यास हा पुरस्कार मिळणारा तो तिसरा क्रिकेटपटू ठरणार आहे. 
ध्यानचंद पुरस्कारासाठी सुनील गावसकर यांच्या नावाची शिफारसमेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारासाठी भारताचे महान सलामीवीर सुनील गावसकर यांच्या नावाची शिफारस बीसीसीआयने केली आहे. हा पुरस्कार आतापर्यंत 51 खेळाडूंना मिळालेला आहे. मात्र आतापर्यंत एकाही क्रिकेटपटूला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही. गावसकर यांना याआधी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.