स्टार क्रिकेटर विराट कोहली फॅमिली आणि सपोर्ट सिस्टीमबद्दल मनातलं बोलला अन् ती गोष्ट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) लगेच मनावर घेतल्याचे दिसते. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना परदेशी दौऱ्यांवर कुटुंबियांना सोबत नेण्यासंदर्भातील नियम शिथिल करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. बीसीसीआयने संबंधित धोरणात लवचिकता आणून खेळाडूंना मोठा दिलासा देण्याचे ठरवले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'फॅमिली मॅन' क्रिकेटर्संना मोठा दिलासा; BCCI नं नियम शिथिल करण्याचं मनावर घेतलं
एएनआयनं बीसीसीआय सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, परदेशी दौऱ्यावर कुटुंबियांना अधिक काळ सोबत ठेवायचे असेल तर त्यासंदर्भात भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना बीसीसीआयकडे विशेष परवानगी घेता येईल. विनंती अर्जाच्या माध्यमातून कुटुंबियांना आपल्यासोबत ठेवण्याचा नवा पर्याय खेळाडूंसाठी खुला होईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेतील पराभवानंतर बीसीसीआयने टीम इंडियातील खेळाडूंसाठी १० नियम लागू केले होते. यातील फॅमिलीसंदर्भातील नियमावर अनेक खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली होती.
काय होता फॅमिलीसंदर्भातील नियम?
जर संघ ४५ दिवस किंवा त्याहून अधिक काळासाठी परदेशी दौऱ्यावर असेल तर खेळाडू आपली पत्नी, जोडीदार किंवा कुटुंबातील अन्य सदस्यांना १४ दिवस आपल्यासोबत ठेवू शकतील, असा नियम लागू करण्यात आला होता. अर्थात दौरा यापेक्षा कमी काळाचा असेल तर कुटुंबियांना सोबत नेता येणार नव्हते. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवेळी हा नियम खेळाडूंनी फॉलोही केला. पण आयपीएलनंतर होणाऱ्या इंग्लंड दौऱ्याआधी भारतीय संघातील खेळाडूंना या नियमातून मोठा दिलासा मिळणार आहे.
विराट कोहलीनंही नाराजी व्यक्त केली अन्...
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) इनोव्हेशन लॅब इंडियन स्पोर्ट्स समिटमध्ये भारतीय क्रिकेट संघातील स्टार क्रिकेटर विराट कोहलीने कठीण दौऱ्यांदरम्यान कुटुंबिय सोबत असणं हा भावनिक आधार असल्याचे मत व्यक्त केले होते. तो सपोर्ट सिस्टीमबद्दल बोलला अन् मग बीसीसीआयनं नियम शिथल करण्यासंदर्भात सूत्रे हलवली, असे दिसते. विरानं मनातलं बोलून दाखवल्यावर लगेच बीसीसीआयने त्याच्या मनासारखा निर्णय घेण्याची तयारी दर्शवल्याचे दिसते.
आधी गर्लफ्रेंडसाठी अन् आता बायका पोरांसाठी BCCI राखणाल 'विराट' मर्जी
बीसीसीआयचा नियमात बदल करण्याचा विचार हा विराट कोहलीसाठी कायपण... हे गाणं पुन्हा वाजल्याचा प्रकार आहे. हे काही पहिल्यांदा घडतं नाही. याआधी २०१४-१५ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात लग्नाआधी विराट कोहलीनं गर्लफ्रेंडच्या रुपात अनुष्का शर्माला सोबत नेण्याची परवानगी मागितली होती. त्यावेळीही त्याची मर्जी राखत बीसीसीआयने त्याला लगेच परवानगी देऊन टाकली होती. आता परफेक्ट फॅमिली मॅन झालेल्या विराट कोहलीनं फॅमिलीसंदर्भातील नियमावर मनातली गोष्ट बोलून दाखवल्यावर लगेच बीसीसीआयने होऊ दे त्याच्या मनासारखं असा काहीसा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता कसं ..तू म्हणशील तसं... हे गाणंच बीसीसीयनं किंग कोहलीसाठी वाजवल्याचे दिसते.