Join us

श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 

श्रेयस अय्यर आणि इशान किशन ही नावं मागील काही महिने चर्चेत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2024 16:10 IST

Open in App

श्रेयस अय्यर आणि इशान किशन ही नावं मागील काही महिने चर्चेत आहेत. या दोघांनीही BCCI च्या देशांतर्गत क्रिकेट खेळण्याच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना वार्षिक करारातून हटवले गेले. हे दोन्ही भारतीय क्रिकेटमधील टॅलेंटेड खेळाडू आहेत, परंतु एका चुकीमुळे त्यांची वार्षिक करारातून हकालपट्टी झाली आणि BCCI च्या नजरेत आले. पण, या दोघांना आता दुसरी संधी देण्याचा निर्णय BCCI ने घेतला आहे. या दोन्ही खेळाडूंचा BCCI ने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या ( NCA) देशांतर्गत क्रिकेट २०२४-२५ च्या पर्वासाठी High Performance Monitoring Programme मध्ये समावेश करण्यात आला आहे. 

TOI ने दिलेल्या वृत्तानुसार टीम इंडियाच्या भविष्याच्या वाटचालीचा विचार करताना BCCI ने काही युवा खेळाडूंना NCA मध्ये बोलावले आहे आणि त्यांच्यावर देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये नजर असेल. ''बीसीसीआय अय्यर आणि किशन यांच्या विरोधात नाहीत. त्यांना देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून खेळाप्रती असलेली त्यांची कमिटमेंट सिद्ध करण्याची संधी आहे,''असे सूत्रांनी सांगितले. 

आयपीएल २०२४ मध्ये दोन्ही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. KKR चे नेतृत्व सांभाळताना श्रेयसने संघाला प्ले ऑफमध्ये पोहोचवले, तर इशानने मुंबई इंडियन्सकडून चांगली कामगिरी केली. पण, रणजी करंडक स्पर्धेत त्यांची अनुपस्थिती चर्चेत आली होती आणि त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली. श्रेयस व इशान यांच्याशिवाय NCA कार्यक्रमात मुशीर खान या युवा अष्टपैलू खेळाडूची निवड केली गेली आहे.  निवड झालेले ३० खेळाडू महिनाभराच्या सराव शिबिरात सहभाग घेतील, ज्याचे नेतृत्व व्हीव्हीएस लक्ष्मण करणार आहे.

 या खेळाडूंमध्ये मयांक यादव, उम्रान मलिक, आवेश खान, कुलदीप सेन, हर्षित राणा, खलील अहमद आणि तुषार देशपांडे यांचाही समावेश आहे. शिवाय रियान पराग, आतुषोश शर्मा, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, साई किशोर, शाम्स मुलानी, तनुष कोटियन व पृथ्वी शॉ यांनाही संधी दिली गेली आहे.  

टॅग्स :श्रेयस अय्यरइशान किशनबीसीसीआय