BCCI Baggage Rule Rules Details : ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय संघातील खेळाडू आणि स्टाफ सदस्यांसाठी कठोर नियमावली तयार केली आहे. या नव्या नियमावलीनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पहिला परदेशी दौरा करणार आहे. बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी दुबईला जाणाऱ्या खेळाडूंना फॅमिलीला सोबत नेण्यास परवानगी नाकारण्यात आलीये. एवढेच नाहीत तर फॅमिलीशिवाय दौऱ्यावर निघताना खेळाडूंना बॅगा भरतानाही काळजी घ्यावी लागणार आहे. काय आहे हा नवा प्रकार? कोणत्या कारणामुळे अनेक निर्बंधामुळे पडली या नव्या नियमाची भर त्यासंदर्भातील खास माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आता लगेजसंदर्भातील नव्या नियमाची भर
बीसीसीआयने खेळाडू आणि स्टाफ सदस्यांसाठी जे नियम तयार करण्यात आले आहेत. त्यात लगेजसंदर्भातील नव्या नियमाची भर पडली आहे. या नव्या नियमानुसार, खेळाडूंना आपल्यासोबत फक्त १५० किलोपर्यंत वजन भरेल, एवढेच सामान सोबत नेता येईल. जर खेळाडूने घेतलेल्या सामानाचे वजन यापेक्षा अधिक असेल तर त्याचे शुल्क हे स्वत: खेळाडूला भरावे लागेल.
एकामुळं संपूर्ण टीम अडचणीत, नेमकं काय घडलं? ज्यामुळे हा नवा नियम आला?
प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार, बीसीसीआयने जो नवा नियम केला आहे त्याला ऑस्ट्रेलियात एका खेळाडूबद्दल घडलेले एक प्रकरण कारणीभूत आहे. संघातील एक खेळाडू २७ बॅगा आणि एक ट्रॉली घेऊन या दौऱ्यावर गेला होता. यात कुटुंबियांसह सहकारी सदस्यांचेही सामान ठेवण्यात आले होते. लगेजचे वजन २५० किलो भरले. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रत्येक शहरात हा खेळाडू एवढे सामान घेऊन फिरला. अतिरिक्त वजनाच्या रुपात बीसीसीआयला लाखो रुपये भरावे लागले. भविष्यातील घाटा टाळण्यासाठी बीसीसीआयने खेळाडूंसाठी लगेज नियमावलीही लागू केलीये.
फॅमिलीशिवाय दुबई दौरा!
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधीच परदेशातील दौऱ्यात खेळाडूला फॅमिलीसोबत किती वेळ घालवता येणार यासंदर्भात नियम समोर आला होता. मोठ्या दौऱ्यात १४ दिवस खेळाडूंना कुटुंबियांसोबत वेळ घालवता येणार आहे, असा उल्लेख नियमावलीत आहे. पण चॅम्पियन्स ट्रॉफीचा दौरा काही खूप मोठा नाही. त्यामुळेच या दौऱ्यात खेळाडूंना कुटुंबियातील सदस्यांना सोबत नेण्याची परवानगी नाकारण्यात आलीये.