बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ म्ङणून ओळखले जाते. नुकत्याच केंद्र सरकारने पारित केलेल्या ऑनलाईन गेमिंग विधेयकामुळे व्यवसाय ठप्प होण्याची चिन्हे निर्माण झाल्याने ड्रीम इलेव्हनने भारतीय क्रिकेट संघाचं प्रायोजकत्व सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघाला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत प्रायोजकाविना खेळावं लागणार आहे. मात्र असं असलं तरी बीसीसीआयला त्यामुळे फारसा फटका बसण्याची शक्यता कमीच आहे. दरम्यान, बीसीसीआयने मागच्या पाच वर्षांत केलेल्या कमाईची डोळे विस्फारवणारी आकडेवारी समोर आली आहे.
एका संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार मागच्या पाच वर्षांमध्ये बीसीआयच्या एकूण कमाईमध्ये १४ हजार ६२७ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. केवळ २०२३-२४ या वर्षामध्ये बीसीसीआयने तब्बल ४ हजार १९३ कोटी रुपये कमावले आहेत.
बीसीसीआयचा कॅश आणि बँक बॅलन्स वाढून ६ हजार ५९ कोटी रुपये एवढा झाला आहे. २०१९ मध्ये बीसीसीआयचा जनरल फंड ३ हजार ९०६ कोटी रुपये एवढा होता. तो आता वाढून ७ हजार ९८८ कोटी रुपये एवढा झाला आहे. तसेच करासाठीही बीसीसीआयने तयारी केली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ३ हजार १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
एका रिपोर्टनुसार गेल्या काही महिन्यांमध्ये देशांतर्गत सामन्यांची संख्या घटल्याने बीसीसीआयची मीडिया राईट्समधून होणारी कमाई घटून ८१३ कोटी रुपयांवर आली आहे. आधी हीच कमाई २ हजार ५२४ रुपये एवढी होती.