नवी दिल्ली : आयपीएल सुरू झाल्यापासून भारतीय क्रिकेट बोर्डाला (बीसीसीआय) सोन्याचे दिवस आले. बोर्डाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण ९,६४१.७ कोटी रुपये कमाई केली. ही आकडेवारी ‘रेडीफ्यूजन’ने प्रसिद्ध केली. दरम्यान, ५९ टक्के कमाई ही एकट्या आयपीएल (५७६१ कोटी) स्पर्धेतून झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
२००८ ला सुरू करण्यात आलेल्या आयपीएलमुळे बोर्डाला प्रचंड आर्थिक फायदा झाला, शिवाय जागतिक ओळख लाभली. लीगला सुरुवात झाली तेव्हा कोणी विचार केला नव्हता की, ही लीग जगातील सर्वांत मोठी क्रिकेट लीग बनेल. बीसीसीआयला जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट बोर्ड बनविण्यात आयपीएलने मोलाची भूमिका बजावली आहे. सरलेल्या आर्थिक वर्षांत बिगर आयपीएल मीडिया राइट्समधूनदेखील बोर्डाला ३६१ कोटींचा नफा झाला.
आयपीएलमधून अशी होते कमाई
मीडिया राइट्स : आयपीएल सामन्यांचे प्रसारण करण्याचा अधिकार. सामन्यांचे थेट प्रक्षेपण आणि हायलाइट्सचे हक्क मीडिया राइट्स प्राप्त करणाऱ्या कंपनीला विकले जातात. यातून बीसीसीआयला सर्वाधिक रक्कम मिळते.
टायटल स्पॉन्सरशिप : २००८ ला पहिल्या आयपीएलची टायटल स्पॉन्सरशिप किंमत केवळ ५० कोटी होती. २०२३ ला हा आकडा ३०० कोटींहून अधिक झाला. टाटा आणि बीसीसीआय यांच्यात दोन वर्षांसाठी एकूण ३०० कोटींचा करार झाला आहे.
फ्रँचायझी शुल्क : कोणताही नवीन संघ आयपीएलशी जुळतो तेव्हा त्यांना फ्रँचायझी शुल्क भरावे लागते. ही प्रक्रिया बोलीद्वारे पूर्ण केली जाते. त्यात वेगवेगळ्या कंपन्या किंवा ग्रुप संघ खरेदीसाठी बोली लावतात. २०२२ ला गुजरात आणि लखनौ हे नवे संघ आयपीएलमध्ये दाखल होताच बोर्डाच्या खात्यात १२५०० कोटींची भर पडली होती.
३०हजार कोटी राखीव
रेडीफ्यूजनचे व्यवस्थापकीय संचालक संदीप गोयल यांनी सांगितले की, बीसीसीआयकडे रणजी करंडक, दुलीप ट्रॉफी, सी. के. नायडू करंडक या स्थानिक स्पर्धांनादेखील व्यावसायिक स्वरूप देण्याची प्रचंड क्षमता आहे.
यामुळे बिगर आयपीएल उत्पन्नात आणखी भर पडू शकेल. बोर्डाकडे सध्या ३० हजार कोटींचा राखीव निधी असून या रकमेतून बोर्डाला दरवर्षी एक हजार कोटींचे व्याज मिळते.
कोणत्या फ्रँचायझीकडून किती शुल्क मिळाले...
रक्कम कोटीमध्ये
लखनौ ७०९०
गुजरात ५६२५
मुंबई ८५०
बंगळुरू ८४५
चेन्नई ६८९
दिल्ली ६३०
पंजाब ५७६
कोलकाता ५६९
राजस्थान ५०८
हैदराबाद ४२५
Web Title: BCCI becomes rich! Record-breaking revenue of ₹ 9,641 crore, also from IPL
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.