Women’s Premier League - महिला प्रीमियर लीग ४ ते २६ मार्च २०२३ या कालावधीत मुंबईत पार पडणार आहे. यासाठी नुकत्याच पार पडलेल्या लिलावात पाच फ्रँचायझींनी ८७ खेळाडूंवर ५९.५० कोटींची बोली लावली. भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना महिला प्रीमियर लीगच्या (WPL) लिलावात सर्वाधिक मानधन घेणारी खेळाडू ठरली. तिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) ३.४० कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने १.८० कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले. आता महिला प्रीमिअऱ लीगला TATA चे बळ मिळणार आहे.
टाटा समुहाने IPL प्रमाणे महिला प्रीमिअर लीगच्या टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले आहेत. BCCI ने बुधवारी ही घोषणा केली. २०२३ ते २०२७ या कालावधीत टाटा ग्रुप महिला प्रीमिअर लीगचा टायटल स्पॉन्सर असणार आहे. महिला क्रिकेटमध्ये हा क्रांतीकारक पाऊल मानले जात आहे. इथे हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष या भारतीय स्टार्ससह एलिसा हिली, डिएंड्रा डॉटिन, एलिसे पेरी, सोफी एक्लेस्टोन आणि सोफी डिव्हाइन या परदेशी स्टारही एकत्र खेळताना दिसणार आहेत. टाटाने प्रती पर्व ३३ कोटी टायटल स्पॉन्सरसाठी मोजणार आहेत आणि पाच वर्षांसाठी १६५ कोटींचं डिल झालं आहे.
दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि यूपी वॉरियर्स या पाच फ्रँचायाझींमध्ये २२ सामने होणार आहेत. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर आणि नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर या लढती होतील. बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले,''टाटा ग्रुप महिला प्रीमिअर लीगचे टायटल स्पॉन्सर असतील, याची घोषणा करताना आनंद होतोय. महिला क्रिकेटसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे.
महिला प्रीमिअर लीगची सुरुवात ४ मार्च रोजी डीवाय पाटील स्टेडियमवर गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील लढतीने होईल. रविवार ५ मार्चला डबल-हेडर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स हे भिडतील.
महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक -
4 मार्चपासून स्पर्धेला सुरूवात
एकूण 22 सामने
4 दुहेरी लढती
डीवाय पाटील स्टेडियमवर 11 सामने.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर 11 सामने.
26 मार्चला अंतिम सामना
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"