क्रिकेटच्या मैदानात आपल्या भेदक माऱ्याने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना घाम फोडणारा जसप्रीत बुमराहच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. २०२३-२४ च्या हंगामात क्रिकेटच्या मैदानात सर्वोत्तम कामगिरीसाठी आयसीसी पुरस्कारात बाजी मारणाऱ्या स्टार गोलंदाजाचा आता बीसीसीआयही खास पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय भारतीय महिला संघातील स्टार बॅटर स्मृती मानधनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बुमराहच्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तुरा, तिसऱ्यांदा या पुरस्कारानं होणार सन्मान
भारतीय क्रिकेट नियमामक मंडळानं वेगवेगळ्या पुरस्कारांची घोषणा केली असून जसप्रीत बुमराहला पॉली उमरीगर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तिसऱ्यांदा बुमराह या पुरस्कारासह सन्मानित करण्यात येणार आहे. याआधी २०१८-१९ आणि २०२१-२२ या वर्षात भारतीय जलदगती गोलंदाजाने हा पुरस्कार पटकवला होता. जसप्रीत बुमराहनं क्रिकेटच्या मैदानात सातत्यपूर्ण सर्वोत्तम दर्जाची कामगिरी करून दाखवली आहे. गत वर्षातील सर्वोत्तम कामगिरीसाठी याआधी आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) सर्वोत्तम कसोटीपटूसह सर्वोत्तम क्रिकेटर्सच्या रुपात बुमराहला सन्मानित केल्याचे पाहायला मिळाले.
स्मृती मानधना सर्वोत्तम महिला क्रिकेटर
महिला क्रिकेटर आणि भारताची उप कर्णधार स्मृती मानधना हिला बीसीसीआयकडून सर्वोत्तम महिला क्रिकेटरला दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. २०२४ या वर्षात स्मृती मानधनाने वनडे ७३४ धावा करून क्रिकेट जगतात आपला दबदबा दाखवून दिला होता. मागील वर्षात स्मृती मानधनाच्या भात्यातून चार शतके पाहायला मिळाली होती. या कामगिरीसह तिने महिला वनडे क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड आपल्या नावे केला होता.
विराट कोहलीनं सर्वाधिक वेळा पटकवलाय हा पुरस्कार
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्ष गाजवणाऱ्या क्रिकेटरला बीसीसीआयकडून पॉली उमरीगर पुरस्काने सन्मानित करण्यात येते. सर्वाधिक वेळा हा पुरस्कार पटकवणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत जसप्रीत बुमराह आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीनं सर्वाधिक पाच वेळा हा पुरस्कार पटकवला आहे. त्याच्याशिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि आर अश्विन यांना प्रत्येकी २-२ वेळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शुबमन गिलनंही हा पुरस्कार पटकवला आहे.