Join us

Ricky Ponting: रिकी पाँटिंगनं टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची ऑफर नाकारली; BCCIनं केली होती विचारणा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याला विचारणा केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 16:44 IST

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याला विचारणा केली होती. पण रिकी पाँटिंगनं बीसीसीआयचा प्रस्ताव अमान्य केल्याची माहिती समोर आली आहे. रिकी पाँटिंग सध्या आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्याच्या मार्गदर्शनानंतर गेल्या तीन वर्षांपासून दिल्लीचा संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरताना पाहायला मिळाला आहे. याशिवाय, २०२० साली आयपीएलचं उप-विजेतेपद दिल्लीला प्राप्त झालं होतं. 

एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार पाँटिंगनं बीसीसीआयचा प्रस्ताव नाकारण्यामागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पाँटिंगनं नकार दिल्यानंतर आता भारतीय माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्याकडे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा देण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. पाँटिंगनं १९९५ आणि द्रविडनं १९९६ साली क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तर दोघांनी २०१२ साली क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. दोघंही दिग्गज क्रिकेटपटू आहेत. पाँटिंगनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७१ शतकं ठोकली आहेत. तर द्रविडच्या नावावर ४८ शतकं जमा आहेत. द्रविड सुरुवातीला भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी तयार नव्हता. पण बीसीसीआयच्या बऱ्याच विनंतीनंतर द्रविडनं होकार कळवला आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या सुत्रांनी दिली आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये 'द वॉल' म्हणून नाव लौकिक मिळवलेला राहुल द्रविड गेल्या ६ वर्षांपासून १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षकपदाचं काम पाहात आहे. सध्या तो बंगलोरस्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख देखील आहे. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआय
Open in App