रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बांगलादेश विरुद्धच्या लढतीनं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणाऱ्या सामन्यात भारतीय संघ विजयी सलामी देत या स्पर्धेत एक पाऊल पुढे टाकण्यास प्रयत्नशील असेल. वनडेत बांगलादेश विरुद्ध भारतीय संघाचा रेकॉर्ड एकदम भारी आहे. पण तरीही टीम इंडिया या संघाला हलक्यात घेणार नाही. यामागच सर्वात मोठं कारण आहे ते २००७ चा वनडे वर्ल्ड कपमधील ती एक लढत ज्या पराभवामुळे टीम इंडियावर आयसीसी स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आली होती. भारतीय संघाला बांगालेदशविरुद्ध मिळालेला तो पराभव आजही क्रिकेट चाहते विसरलेले नाहीत. पण त्यावेळी संघात असलेला हुकमी एक्का शाकीब अल हसन आता बांगलादेशच्या ताफ्यात नाही. त्यामुळे टीम इंडिया थोटी टेन्शन फ्री असेल. इथं एक नजर टाकुयात भारत-बांगलादेश यांच्यातील वनडेतील रेकॉर्ड्सवर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दोन्ही संघ फक्त एकदा समोरासमोर आले, अन्...
भारत-बांगलादेश हे आशियातील दोन संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आतापर्यंत फक्त एकदाच समोरासमोर आले आहेत. २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत उपांत्य फेरीत भारत-बांगलादेश यांच्यात लढत झाली होती. या लढतीत भारतीय संघाने दाबात विजय नोंदवून फायनल गाठली होती. शेवटी फायनलमध्ये पाकनं भारतीय संघाला धक्का दिला होता.
वनडेत भारतीय संघाचा बोलबाला, बांगालदेशला विजयाचा दुहेरी आकडाही नाही गाठता आला
एकंदरीत वनडेचा विचार करता भारत-बांगलादेश दोन्ही संघात आतापर्यंत ४१ सामने खेळवण्यात आले आहेत. यात भारतीय संघाने ३२ सामने जिंकले असून फक्त ८ सामन्यात बांगलादेशच्या संघाला यश मिळाले आहे. एक सामने अनिर्णितही राहिला आहे. मागील ५ वनडेत भारतीय संघ ३-२ अशा आघाडीवर आहे.
भारत-बांगलादेश यांच्यातील वनडेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
दोन्ही संघातील वनडे लढतीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावे आहे. त्याने १६ डावात आतापर्यंत ९१० धावा कुटल्या आहेत. १३६ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. त्यापाठोपाठ या यादीत रोहित शर्माचे नावे येते. १७ डावा त्याने ७८६ धावा केल्या असून १३७ ही रोहितची सर्वोच्च धावसंख्या आहे. मग या यादीत शाकीब अल हसनचा नंबर लागतो. २१ डावात त्याने ७५१ धावा केल्या आहेत. एका बाजूला विराट आणि रोहित चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लढतीत भारतीय संघाचा भाग आहेत. दुसरीकडे शाकीब हा यावेळी बांगलादेशच्या संघात दिसत नाही.
सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये बांगालदेशच्या खेळाडूंची हवा
दोन्ही संघातील वनडेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप ३ मध्ये एकही भारतीय गोलंदाज दिसत नाही. या यादीत शाकीब अल हसन २२ डावातील २९ विकेट्ससह सर्वात आघाडीवर आहे. ३६ धावांत ५ विकेट्स ही त्याची भारताविरुद्धची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. मुस्तफिझुर रहमान याने १२ डावात टीम इंडियाविरुद्ध २५ विकेट्स घेतल्या असून ४३ धावा खर् करून ६ विकेट्स ही त्याची सर्वोच्च कामगिरी राहिली आहे. मशरफे मोर्तझा याने २० डावात २३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्यााचा रेकॉर्ड आहे.