Bangladesh Hindu India IPL 2026: बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजकीय तणाव भरपूर वाढला आहे. परिणामी मुस्तफिजूर रहमानला IPL 2026 मधून वगळण्याचे आदेश BCCIने दिले. त्यानुसार, KKRने त्याला संघातून वगळून बदली खेळाडूला संघात स्थान दिले. आता कोणताही बांगलादेशी खेळाडू IPL मध्ये सहभागी होऊ शकणार नाही हे स्पष्ट झाले आहे. क्रिकेटमध्ये भारताने जी कठोर भूमिका घेतली, तसेच इतर क्रीडा स्पर्धांमध्ये होणार का? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. भारताचे विश्वविजेता कर्णधार आणि प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे (PGTI) प्रमुख कपिल देव यांनी बांगलादेशी खेळाडूंवर भाष्य केले आहे.
क्रिकेट पाठोपाठ गोल्फमध्ये बांगलादेशी खेळाडूंवर बंदी?
मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून वगळण्यात आल्यापासून भारत आणि बांगलादेश यांच्यात वाद सुरू आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने रविवारी सुरक्षेच्या कारणास्तव आणि सरकारी सल्ल्याचा हवाला देत पुढील महिन्यात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी आपला क्रिकेट संघ भारतात न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, बांगलादेश सरकारने त्यांच्या देशात IPLचे प्रसारण करण्यास बंदी घातली आहे. हे सर्व पाहता, भारत सरकार बांगलादेशी खेळाडूंना आता सर्व खेळांमधून वगळणार का हा एक मोठा प्रश्न आहे. त्याचदरम्यान,तीन बांगलादेशी गोल्फपटूंवर बंदी घालण्यात येऊ शकेल का? असा सवाल कपिल देव यांनी विचारला गेला. त्यावर ते म्हणाले, "आम्ही या मुद्द्यावर चर्चा करू. आम्ही अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही."
बांगलादेश खेळाडूंमध्ये कुणाचा समावेश?
पीजीटीआय टूरमध्ये भाग घेणाऱ्या प्रमुख बांगलादेशी गोल्फपटूंमध्ये जमाल हुसेन, मोहम्मद सिद्दीकुर रहमान आणि मोहम्मद अकबर हुसेन यांचा समावेश आहे. या तिघांना आगामी काळात होणाऱ्या गोल्फ स्पर्धेसाठी भारतात येऊ न देण्यावर चाहते ठाम आहेत. पण कपिल यांच्यामते सध्या तरी याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही.
दरम्यान, ICC शी संपर्क साधण्याच्या बांगलादेश बोर्डाच्या निर्णयावर भाष्य करण्यास कपिल यांनी नकार दिला. ते म्हणाले, "मी क्रिकेट खेळलो आहे, जो एक सांघिक खेळ आहे. दुसरीकडे, गोल्फ हा एक वैयक्तिक खेळ आहे. त्यामुळे मी यावर भाष्य करू शकत नाही. पण भारताबाबत बोलायचे झाल्यास, गोल्फमध्ये भारताला सांघिक स्वरूपाची आवश्यकता आहे. आमच्या लीगचा उद्देश गोल्फपटूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांना एक मजबूत व्यासपीठ देणे असे आहे, असे ते म्हणाले.