Bangladesh vs Pakistan 3rd T20I : पाकिस्तान संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसारखी कामगिरी करता आली नाही. बांगलादेशविरुद्ध त्यांनी ट्वेंटी-२० मालिकेत ३-० असा निर्भेळ यश मिळवले असले तरी यजमानांनी पाकिस्तानला विजयासाठी संघर्ष करायला लावला. तिसऱ्या सामन्यात तर बांगलादेशनं विजय मिळवलाच होता, पण थरारक लढतीत पाकिस्ताननं बाजी मारली. १२५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला अखेरच्या चेंडूपर्यंत संघर्ष करावा लागला. अखेरच्या षटकात विजयासाठी ८ धावांची गरज असताना बांगलादेशचा कर्णधार महमुदुल्लाह यानं तीन विकेट्स घेत पाकिस्तानच्या तोंडाला फेस आणला होता.
प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशला ७ बाद १२४ धावा करता आल्या. मोहम्मद नईमनं ४७ ( २ षटकार व २ चौकार) खेळी केली. त्याला शमिम होसैन ( २२) व आफिफ होसैन ( २०) यांनी चांगली साथ दिली. पाकिस्तानकडून मोहम्मद वासिम ( २-१५) व उस्मान कादीर ( २-३५) यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
बाबर आजमचा अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राहिला. १९ धावांवर तो माघारी परतला. मोहम्मद रिझवान व हैदर अली यांनी पाकिस्तानचा डाव सावरताना अनुक्रमे ४० व ४५ धावा केल्या. पण, त्यांच्या धावांचा वेग संथ होता आणि अखेरच्या ६ चेंडूंत त्यांना विजयासाठी ८ धावा करायच्या होत्या.
६ चेंडू ८ धावा करताना पाकिस्तान प्रचंड दडपणाखाली गेला. महमुदुल्लाहनं पहिला चेंडू निर्धाव फेकला. त्यानंतर सलग दोन चेंडूंत सर्फराज अहमद ( ६) व हैदर अली यांची विकेट घेत त्यानं सामन्याची चुरस अधिक वाढवली. इफ्तिकार अहमदनं चौथ्या चेंडूवर षटकार खेचून पाकिस्तानवरील दडपण कमी केलं. पण, महमुदुल्लाहनं पुढच्याच चेंडूवर त्यालाही माघारी पाठवलं. अखेरच्या चेंडूवर मोहम्मद नवाझनं चौकार खेचून पाकिस्तानचा विजय पक्का केला अन् कर्णधार आजमसह पाकिस्तानी संघानं सुटकेचा निश्वास टाकला.