Bangladesh Historic Win: बांगलादेशच्या क्रिकेट संघाने न्यूझीलंडला पराभूत करून क्रिकेट विश्वाला धक्का दिला. न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशने ट्वेंटी-२० मालिकेतील पहिल्याच सामन्यात शानदार विजय मिळवला. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून बांगलादेशने विजयी सलामी दिली. खरं तर पहिल्यांदाच ट्वेंटी-२० मध्ये बांगलादेशने न्यूझीलंडला त्यांच्याच घरात पराभूत करण्याची किमया साधली. या ऐतिहासिक विजयाचा हिरो ठरला मेहदी हसन, त्याने अष्टपैलू खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
नेपियर येथे झालेल्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून यजमानांना फलंदाजीसाठी आमंत्रित केले. यजमान किवी संघाने निराशाजनक कामगिरी करताना आघाडीचे फलंदाज स्वस्तात गमावले. लक्षणीय बाब म्हणजे केवळ १ धावसंख्या असताना न्यूझीलंडचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. मेहदी हसनने पहिल्याच षटकात टीम सिफर्टला (०) बाहेरचा रस्ता दाखवला. त्याच्या पुढच्या षटकात शोरीफुल इस्लामने फिन ॲलेन (१) आणि ग्लेन फिलिप्स (०) यांना आपल्या जाळ्यात फसवले.
बांगलादेशचा ऐतिहासिक विजय
बांगलादेशच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करताना सुरूवातीपासूनच यजमान संघावर दबाव टाकला. पण, जिमी नीशमच्या शानदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने सन्मानजनक धावसंख्या गाठली. त्याने २९ चेंडूत ४८ धावा करून किवी संघाची धावसंख्या १३० पार नेली. अखेर निर्धारित २० षटकांत न्यूझीलंडने ९ बाद १३४ धावा केल्या. बांगलादेशकडून शोरफुल इस्लामने सर्वाधिक (३) बळी घेतले, तर मेहदी हसनला (२), मुस्ताफिजुर रहमान (२) आणि तनजीम साकिब आणि रिशद हुसैन यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
१३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला सुरूवातीलाच मोठा झटका बसला. रॉनी तालुकदार (१०) बाद झाल्यानंतर बांगलादेशने सावध खेळी केली. कर्णधार शांतो १९ धावा करून तंबूत परतला. पण, सलामीवीर लीटन दास (४२) खेळपट्टीवर टिकून राहिला अन् बांगलादेशने विजयाकडे कूच केली. ९७ धावांवर पाच गडी बाद झाल्यानंतर न्यूझीलंडच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला. पण, येथून मेहदी हसनने १६ चेंडूत १९ धावांची खेळी खेळली आणि सलामीवीर लिटन दास (४२) याला चांगली साथ दिली. या दोघांनी भागीदारी करून बांगलादेशला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. बांगलादेशने १८.४ षटकांत ५ गडी गमावून १३७ धावा केल्या आणि विजयी सलामी दिली.