टी-२० क्रिकेट जगभरात लोकप्रिय ठरताना दिसते. क्रिकेटच्या छोट्या फॉर्मेटमध्ये तुफान फटकेबाजीचा नजराणा दाखवत अनेकदा खेळाडू आणि संघ मोठे विक्रम प्रस्थापित करतानाही दिसून येते. पण काही वेळा असे काही रेकॉर्ड पाहायला मिळतात ज्याची कदाचित कुणी कल्पनाच केलेली नसते. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सामना सुपर ओव्हरमध्ये गेला की, त्यातील मजा आणि थरार काही औरच. सामना टाय झाल्यावर बऱ्याचदा सुपर ओव्हरच्या माध्यमातून निकाल लावला जातो. पण एका आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात सुपर ओव्हरचा थरार रंगल्यावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेलाय. अर्धी ओव्हर खेळून संघाला खातेही उघडता आले नाही. परिणामी समोरच्या संघाला १ धावांचे टार्गेट मिळाले. याआधी असं कधीच घडले नव्हते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तीन देशांच्या मालिकेत अनोख्या रेकॉर्डची नोंद
सध्याच्या घडीला मलिशियात सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत हा प्रकार घडला. या स्पर्धेत यजमान मलेशियाशिवाय बहरीन आणि हाँगकाँग या संघाचा समावेश आहे. १४ मार्चला बहरीन विरुद्ध हाँगकाँग यांच्यात रंगलेल्या सामना सुपर ओव्हरमध्ये गेला अन् या सुपर ओव्हरमध्ये बॅटिंगमध्ये फटकेबाजी पाहायला मिळण्याऐवजी दोन्ही फलंदाज एकही धाव न करता माघारी फिरले.
हाँगकाँगनं पहिल्यांदा बॅटिंग केली अन् बेहरीनच्या संघानं तेवढ्याच धावा करत सामना टाय केला
या सामन्यात हाँगकाँगच्या संघानं निर्धारित २० षटकात ७ बाद १२९ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना बहरीनच्या संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात १२९ धावा केल्या. सामना टाय झाल्यामुळे निकाल सुपर ओव्हरमध्ये लावण्याची वेळ आली. सुपर ओव्हरच्या नियमानुसार, धावांचा पाठलाग करणारा बहरीन संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण सुपर ओव्हरमधील ३ चेंडूत संघानं २ विकेट गमावल्या अन् संघाच्या नावे सुपर ओव्हरमध्ये शून्यावर आटोपण्याची नामुष्की ओढावली. हाँगकाँगनं एक धाव करत हा सामना अगदी सहज खिशात घातला.