Join us

मोठी बातमी : बाबर आजमची कॅप्टन्सी जाणार; PCBच्या तातडीच्या बैठकीत निर्णय, ३ खेळाडूंची नावं चर्चेत 

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर त्यांचे चाहते प्रचंड संतापले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2023 21:33 IST

Open in App

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर त्यांचे चाहते प्रचंड संतापले आहेत. भारतात सुरू असलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत सलग दोन विजयानंतर पाकिस्तानला सलग तीन पराभव पत्करावे लागल्याने स्पर्धेतील आव्हानच संकटात आले आहेत. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) आज लाहोर येथे निवड समिती प्रमुख इंजमान-उल-हक यांच्यासह काही प्रमुख सदस्यांसोबत बैठक बोलावली. त्यात झालेल्या चर्चेनुसार बाबर आजम ( Babar Azam) याच्या नेतृत्वावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर बाबर आजमची कॅप्टनसी जाणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.

पाकिस्तानला काल अफगाणिस्तानकडून दारूण पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानचे २८३ धावांचे लक्ष्य अफगाणिस्तानने ४९ षटकांत २ बाद २८६ धावा करून पार केले. पाकिस्तानचा हा सलग तिसरा पराभव आहे आणि ते -०.४०० नेट रन रेटसह पाचव्या क्रमांकावर घसरले आहेत. उर्वरित ४ सामन्यांत इंग्लंड, न्यूझीलंड, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा पाकिस्तानला सामना करायचा आहे आणि हे चारही सामने जिंकले तर त्यांच्यासाठी आशेचा किरण निर्माण होऊ शकतो. पण, पाकिस्तानी खेळाडूंची देहबोली पाहता त्यांच्याकडून हे होईल असे वाटत नाही.

संघाच्या या खराब कामगिरीमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नाराज आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेनंतर बाबरला कर्णधारपदावरून हटवणार असल्याचे वृत्त समोर येतेय. वर्ल्ड कपनंतर पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तेथे कसोटी व वन डे मालिकेत सर्फराज अहमद ( sarfaraz ahmed) हा नेतृत्व करेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. तर ट्वेंटी-२० संघासाठी शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद रिझवान यांचे नाव समोर येतेय.  

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपबाबर आजमपाकिस्तानऑफ द फिल्ड