Babar Azam Pakistan Cricket downfall : सध्या सुरु असलेल्या Champions Trophy 2025 स्पर्धेत पाकिस्तानचा संघ यजमानपद भूषवत आहे. पण वाईट बाब म्हणजे त्यांना साखळी फेरीतच स्पर्धेबाहेर व्हावे लागले. प्रथम न्यूझीलंडच्या संघाने त्यांना पाकिस्तानमध्ये सहज पराभूत केले. त्यानंतर दुबईच्या मैदानावर भारतीय संघाने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. साखळी फेरीतील शेवटचा सामना बांगलादेशविरूद्ध होता. पण हा सामना पावसामुळे रद्द झाला. अशा परिस्थितीत आपल्याच यजमानपदाच्या स्पर्धेत पाकिस्तानी संघाला एकही विजय न मिळवता स्पर्धेतून बाद व्हावे लागले. पाकिस्तानच्या या परिस्थितीवर सारेच टीका करत आहेत. तशातच पाकिस्तानच्या संघातून बराच काळ बाहेर असलेला अहमद शहजाद याने या वाईट स्थितीसाठी बाबर आझमला कारणीभूत ठरवले आहे.
बाबरला कर्णधार करणं हीच मोठी चूक होती
अहमदने स्पोर्ट्सतक दिलेल्या मुलाखतीत आपली रोखठोक मतं मांडली. तो म्हणाला, "बाबर आझम आज ज्या स्थितीत आहे ते पाहून त्याची दया येते. जेव्हा त्याचं करियर सुरु झालं होतं त्यावेळी असं वाटलं होतं की तो पाकिस्तानचा सर्वोत्तम खेळाडू बनेल आणि जगातील सगळे रेकॉर्ड्स तोडेल. पण आता सगळं फोल ठरतंय. सर्वोत्तम खेळाडूला संघाचा कर्णधार करणं ही मोठी चूक होती. तो चांगला खेळत होता, पण कर्णधार झाल्यावर त्याच्या आजुबाजूला त्याचे मित्रमंडळी असायचे. त्या नादात त्याने संघात मेरिटच्या आधारे खेळाडू न घेता आपल्या मित्रांना टीममध्ये घेतलं आणि पाकिस्तान क्रिकेटची वाट लावली. जेव्हा तुम्ही चांगल्या खेळाडूंना नाकारून मित्रांना संधी देता तेव्हा देशांतर्गत क्रिकेटची चाकं फिरणंही बंद हाऊन जातं. कारण चांगली कामगिरी करूनही त्यांना संधी मिळत नसते."
पाकिस्तान क्रिकेटमध्ये कायमच राजकीय हस्तक्षेप
"दुसरा मुद्दा म्हणजे पाकिस्तान क्रिकेटमध्ये कायमच राजकीय हस्तक्षेप होता. सध्या पाकिस्तानी संघाची जी वाट लागलीय त्याला गेल्या दोन वर्षातील परिस्थिती जबाबदार नाही, त्याहीपेक्षा आधीपासून या खेळात राजकारण शिरलेलं आहे. बदलत्या काळानुरूप जेव्हा तुम्ही बदलत नाही, क्रांती घडवत नाही, तेव्हा संघाची वाट लागते. क्षमता असलेल्या खेळाडूंना नाकारणं आणि संघात सुरु असलेल्या मुजोरीला आळा न घालणा या दोन गोष्टींमुळे पाकिस्तानी क्रिकेटची ही अवस्था आहे.