Babar Azam Mohammad Rizwan Pakistan Cricket : आगामी टी२० मालिकेसाठी पाकिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. या मालिकेसाठी संघ निवडताना संघनिवड समितीने मोठा निर्णय घेतला. पाकिस्तानचे अनुभवी क्रिकेटपटू बाबर आझम, मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) या तिघांनाही संघात स्थान मिळालेले नाही. हे तिघेही खेळाडू पाकिस्तानच्या टॉप खेळाडूंमध्ये गणले जातात. पण बांगलादेश विरूद्धच्या टी२० मालिकेसाठी त्यांना संघात संधी देण्यात आलेली नाही. मिळालेल्या वृत्तानुसार, नवीन मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी तिघांचीही निवड करण्यास नकार दिला. याचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे.
बाबर-रिझवानची टी-२० कारकीर्द संपली?
बाबर, रिझवान आणि आफ्रिदी या तिघांना टी२० मालिकेत निवडले जाणार नाही असे नव्या मुख्य प्रशिक्षकांनी स्पष्टपणे सांगून टाकले. या अनुभवी खेळाडूंनी जागतिक कसोटी अजिंक्यपद आणि एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान दोघांनीही या वर्षी एकही कसोटी सामना खेळलेला नाही. शाहीन आफ्रिदीने मात्र मार्चमध्ये न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिका खेळली होती. त्यामुळे बाबर आणि रिझवान यांची टी२० कारकीर्द संपुष्टात आली आहे का, अशी कुजबूजही सुरु आहे.
आणखी दोन खेळाडूंचीही निवड नाही...
मोठी बातमी अशी आहे की हॅरिस रॉफ आणि शादाब खान या दोघांचीही पाकिस्तानी संघात निवड झालेली नाही. कारण ते दोघेही जखमी आहेत आणि त्यांची तंदुरुस्ती १०० टक्के नाही. तुलनेने नवखे असलेले मोहम्मद नवाज, सुफी मुकीम आणि सलमान मिर्झा या तिघांना पाकिस्तानने संघात स्थान दिले आहे.
बांगलादेश टी२० मालिकेसाठी पाकिस्तान संघ
सलमान आगा (कर्णधार), अबरार अहमद, अहमद दानियाल, फहीम अश्रफ, फखर झमान, हसन नवाज, हुसेन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, साहिबजादा फरहान, सॅम अयुब आणि सुफियान मुकीम