Join us

बाबर आझमची 'मॅचविनिंग' खेळी; शोएब अख्तर, वकार युनिससारख्या दिग्गजांची केली धुलाई

Babar Azam Match Winner: बाबरने आपल्या संघातर्फे सर्वाधिक धावा केल्या आणि दोन विकेट्सही घेतल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 17:16 IST

Open in App

Babar Azam Match Winner : आशिया कपसाठी पाकिस्तान संघात बाबर आझमला स्थान मिळाले असेल. पण, पाकिस्तानमध्ये खेळल्या गेलेल्या एका प्रदर्शनीय सामन्यात त्याने एकट्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. हा सामना पेशावर झल्मी आणि लेजेंड्स इलेव्हन यांच्यात एका खास उद्देशाने खेळवण्यात आला होता. खैबर पख्तूनख्वा क्रीडा विभाग आणि स्थानिक सरकार यांनी आयोजित केलेल्या या १५-१५ षटकांच्या सामन्याचा उद्देश पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत गोळा करणे हा होता. या सामन्यात बाबर आझम पेशावर झल्मीचे नेतृत्व करत होता, तर इंझमाम उल हक लेजेंड्स इलेव्हनचा कर्णधार होता. हा सामना ३० ऑगस्ट रोजी दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आला होता.

बाबर आझमच्या संघाच्या १४४ धावा

सामन्यात पेशावर झल्मीच्या संघाने प्रथम फलंदाजी करत १४.४ षटकांत १४४ धावा केल्या. पेशावर झल्मीचा कर्णधार बाबर आझमने पेशावर झल्मीसाठी सर्वाधिक धावा केल्या. सलामीला आलेल्या बाबर आझमला शोएब अख्तर आणि वकार युनूस सारख्या दिग्गज वेगवान गोलंदाजांचा सामना करावा लागला. बाबरने त्यांची गोलंदाजी अतिशय चलाखीने खेळून काढले. बाबर आझमने त्याच्या डावात फक्त २३ चेंडूंचा सामना केला आणि त्यावर ४१ धावा केल्या. या धावसंख्येसह, तो त्याच्या संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. बाबर अख्तरच्या चेंडूवर बाद झाला नाही आणि वकारही त्याची विकेट घेऊ शकला नाही. पण सईद अजमलच्या चेंडूवर बाबर आझम क्लीन बोल्ड झाला.

इंझमाम, अझहर महमूदने २०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली

बाबर आझमच्या २३ चेंडूत ४१ धावांच्या खेळीमुळे पेशावर झल्मीने लेजेंड्स इलेव्हनसमोर १४५ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करताना लेजेंड्स इलेव्हन संघाला ६ गडी बाद १३८ धावाच करता आल्या आणि त्यांना फक्त ६ धावांनी पराभव पत्करावा लागला. लेजेंड्स इलेव्हनच्या पराभवाचे मुख्य कारण त्यांच्या टॉप ६ फलंदाजांचे अपयश होते. लेजेंड्स इलेव्हनसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज त्याचा कर्णधार इंझमाम-उल-हक होता. इंझमामने २०० च्या स्ट्राईक रेटने २३ चेंडूत ४६ धावा केल्या. तर अझहर महमूदने २०० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने १५ चेंडूत ३४ धावा केल्या. तरीही त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.

बाबर आझमच्या २ विकेट्स

पेशावर झल्मीकडून फलंदाजीत सर्वाधिक धावा करणाऱ्या बाबर आझमने गोलंदाजीतही चमत्कार केला. बाबर आझमने ३ षटकांत २१ धावा देत २ विकेट घेतल्या. बाबर आझमने आधी अझर अली आणि नंतर युनूस खानची विकेट घेतली.

टॅग्स :बाबर आजमशोएब अख्तर