पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. कधीकाळी त्याची तुलना भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशी केली जात होती, मात्र, आता त्याचा सातत्याने ढासळणारा फॉर्म पाहता, तो आता त्यांच्याशी कधीच बरोबरी करू शकणार नाही, अशी चर्चा सुरू झाली. परिस्थिती अशी आहे की, यापुढेही फॉर्म सुधारला नाही, तर वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षीच बाबर आझम क्रिकेटमधून निवृत्त होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
बाबर आझमचा खराब फॉर्म दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सध्याच्या मालिकेतही कायम आहे. फैसलाबाद येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो स्वस्तात बाद झाला, ज्यामुळे त्याच्या क्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या सामन्यात त्याने १३ चेंडूत फक्त ११ धावा केल्या आणि तो बाद झाला. या खेळीत त्याला एकही चौकार किंवा षटकार मारता आला नाही. याआधी पहिल्या एकदिवसीय सामन्यातही तो केवळ सात धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला होता.
टी२० आणि कसोटी मालिकेतही संघर्ष
एकदिवसीय मालिकेपूर्वी खेळल्या गेलेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतही बाबरला मोठी कामगिरी करता आली नाही. संपूर्ण मालिकेत त्याने फक्त एक अर्धशतक (६८ धावा) झळकावले आणि इतर सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला. त्याचप्रमाणे, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतही त्याला फक्त एक अर्धशतकच करता आले. या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, सध्या बाबर आझम प्रत्येक धावेसाठी संघर्ष करताना दिसत आहे.
कर्णधारपदावरून हकालपट्टी
काही काळापूर्वी बाबर आझम पाकिस्तान क्रिकेट संघाच्या तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार होता. परंतु, संघाच्या आणि स्वतःच्या खराब कामगिरीमुळे त्याला कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्याला काही कालावधीसाठी टी-२० संघातून वगळण्यातही आले. संघात परतल्यानंतरही त्याच्या कामगिरीत कोणताही मोठा फरक पडलेला नाही.
बाबर आझमची करिअर धोक्यात?
बाबर आझमने २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि वयाच्या ३१ व्या वर्षी त्याची कारकीर्द संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. बाबर आझम लवकरच धावांचा पाऊस पाडतो की, पीसीबी त्याच्याबाबत काही कठोर निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.