Axar Patel to captain Delhi Capitals in IPL 2025 : आयपीएलच्या नव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची धूरा कुणाच्या खांद्यावर पडणार? या प्रश्नाच उत्तर अखेर मिळालं आहे. दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीनं सोशल मीडिया अकाउंटवरुन एक खास व्हिडिओ शेअर करत संघाच्या नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. भारतीय संघाकडून आपल्या अष्टपैलूत्व कामगिरीसह कर्तृत्व सिद्ध करून राष्ट्रीय संघाचा उप-कर्णधार झालेला अक्षर पटेल आता आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. २०२५ च्या हंगामात लोकेश राहुलसह सुरुवातीपासून त्याने नाव आघाडीवर होते. लोकेश राहुलनं कर्णधारपदाची ऑफर नाकरल्यावर त्याच्याकडेच ही जबाबदारी येणार हे जवळपास निश्चित होते, आता फ्रँचायझी संघानं यावर अधिकृतरित्या मोहर उमटवलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिल्ली कॅपिटल्सचा १३ वा कर्णधार ठरला अक्षर पटेल
आयपीएलमधील सर्व ९ फ्रँचायझी संघाचे कर्णधार ठरल्यावर अखेर सर्वात शेवटी दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व कोण करणार ते ठरलं आहे. अक्षर पटेल हा आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील दिल्ली कॅपिटल्सचा १३ वा कर्णधार आहे. आतापर्यंत १३ कर्णधारांपैकी एकालाही संघाला चॅम्पियन करता आलेले नाही. त्यामुळे अक्षर पटेलसाठी नवी जबाबदारी निश्चितच आव्हानात्मक असेल.
२०१९ पासून दिल्लीच्या ताफ्यातून खेळतोय अक्षर
अक्षर २०१९ पासून दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून खेळताना दिसते. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाआधी संघानं तब्बल १८ कोटी रुपयांसह त्याला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएलमध्ये १५० सामन्यांत अक्षरने १३०.८८ च्या स्ट्राईक रेटने १६५३ धावा केल्या आहेत. याशिवाय डावखुऱ्या फिरकीपटूच्या खात्यात १२३ विकेट्सही जमा आहेत.
आधी, टीम इंडियाच्या टी-२० संघाचा उप कर्णधार, मग फलंदाजीत बढती अन् आता दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टनअक्षर पटेल हा टीम इंडियाचा हुकमी एक्का ठरला आहे. त्याने मैदानातील आपलं कर्तृत्व सिद्ध केल्यावर यावर्षी इंग्लंड विरुदच्या घरच्या मैदानातील टी-२० मालिकेत त्याच्यावर भारतीय संघाच्या उप-कर्णधाराची जबाबादारी सोपवण्यात आली होती. एवढेच नाहीतर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत फलंदाजीत बढती दिल्यावर त्याने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत संघाला चॅम्पियन करण्यात मोलाचं योगदान दिल्याचे पाहायला मिळाले. आता दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला चॅम्पियन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरत तो नेतृत्वाची खास छाप सोडण्यासाठी प्रयत्नशील असेल.
दिल्ली कॅपिटल्स संघाचे आतापर्यंतचे कर्णधार अन् त्यांनी संघाला मिळवून दिलेल्या विजयाचा रेकॉर्ड
- वीरेंद्र सेहवाग-(२००८-२०१२) - ५२ सामन्यात २८ विजय
- गौतम गंभीर-(२००८-२०१२)- २१ सामन्यात १० विजय
- दिनेश कार्तिक-(२०१०- २०१४)- ६ सामन्यात २ विजय
- जेम्स होप्स-(२०११) ३-सामन्यात एकही विजय नाही
- महेला जयवर्धने-(२०१२-२०१३) १६ सामन्यात ४ विजय
- डेविड वॉर्नर-(२०१३-२०२३)-१६ सामन्यात ५ विजय
- केविन पीटरसन-(२०१४)-११ सामन्यात १ विजय
- जेपी ड्युमिनी-(२०१५-२०१६)-१६ सामन्यात ६ विजय
- झहिर खान-(२०१६-२०१७)-२३ सामन्यात १० विजय
- करुण नायर (२०१७) ३ सान्यात २ विजय
- श्रेयस अय्यर-(२०१८-२०२०)-४१ सामन्यात २१ विजय
- रिषभ पंत-(२०२१-२०२४)-४३ सामन्यात २३ विजय
- अक्षर पटेल-२०२५