भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाने यजमानांचा ४८ धावांनी पराभव करत मालिकेत २-१ अशी निर्णायक आघाडी घेतली आहे. या विजयामुळे टीम इंडियाला मालिका गमावण्याचा चिंता नाही, आता शेवटच्या सामन्यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
या विजयात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. अक्षरने केवळ २१ धावांची नाबाद खेळीच केली नाही, तर गोलंदाजी करताना दोन महत्त्वाचे विकेट्स घेतले, ज्यामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अक्षर पटेलचा हा तिसरा सामनावीर पुरस्कार आहे.
या विशेष कामगिरीसह, अक्षर पटेलने आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत भारताचा सुपरस्टार विराट कोहली आणि वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल यांच्याशी बरोबरी साधली. अक्षर पटेल आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणाऱ्या या दिग्गजांसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर आहे.
या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. दुसऱ्या सामन्यात भारताला चार विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर भारताने पुनरागमन करत तिसरा आणि चौथा सामना जिंकून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. आता भारत या टी-२० मालिकेचा पाचवा आणि निर्णायक सामना ८ नोव्हेंबर रोजी ब्रिस्बेनमधील गाबा स्टेडियमवर खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.