Join us

AUSvPAK : पाकिस्तानच्या कर्णधारानं मैदानावरच काढले सहकाऱ्याचे वाभाडे, Video

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा ट्वेंटी-20 सामना कॅनबेरा येथे सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे सध्या जड दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 15:11 IST

Open in App

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा ट्वेंटी-20 सामना कॅनबेरा येथे सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे पारडे सध्या जड दिसत आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानचा निम्मा संघ त्यांनी 106 धावांत माघारी पाठवला. कर्णधार बाबार आझम यानं संघाचा डोलारा सक्षमपणे सांभाळला, परंतु त्याला इतरांकडून हवी तशी साथ मिळाली नाही. त्यामुळे मैदानावर त्याचा पाराही चढलेला पाहायला मिळाला. त्यानं चक्क सहकाऱ्याचे वाभाडे काढले आणि त्याचा हा व्हिडीओ सध्या व्हायलर होत आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानला ऑसींनी चांगले धक्के दिले. फाखर जमान ( 2) आणि हॅरीस सोहैल ( 6) यांना अनुक्रमे पॅट कमिन्स व केन रिचर्डसन यांनी माघारी पाठवले. त्यानंतर मोहम्मद रिझवानने (14) काही काळ आझमसह संघाचा डाव सावरला. पण, त्याला अ‍ॅस्टन अ‍ॅगरने बाद केले. पाचव्या क्रमांकावर आलेल्या आसीफ अलीकडून आझमला अपेक्षा होत्या. मात्र, अवघे पाच चेंडूंत 4 धावा करून तो माघारी परतला. संघ अडचणीत असताना आसीफने दाखवलेल्या उतावळेपणावर आझम भडकला आणि मैदानावरच तीव्र शब्दात त्यानं नाराजी व्यक्त केली. आसीफनं अ‍ॅगरच्या गोलंदाजीवर फटका मारला आणि तो पॅट कमिन्सने सहज झेलला. त्यावरून आझम भडकला.

पाहा व्हिडीओ... आसीफची विकेट गेल्यानंतर आझमही माघारी परतला. त्यानं 38 चेंडूंत 6 चौकारांसह 50 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरच्या डायरेक्ट हिटनं आझमला माघारी पाठवले. त्यानंतर इफ्तियार अहमदनं 34 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकार खेचत नाबाद 62 धावा करताना संघाला 6 बाद 150 धावांपर्यंत मजल मारून दिली. 

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना पावसामुळे सुरुवातीला 15-15 षटकांचा खेळवण्यात आला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 107 धावा केल्या. कर्णधार बाबर आझमने 59 धावा, तर मोहम्मद रिझवानने 31 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑसींनी 3.1 षटकांत 41 धावा चोपून काढल्या. अॅरोन फिंचने 16 चेंडूंत पाच चौकार व दोन षटकार खेचत 37 धावा चोपल्या. पण, त्यानंतर पावसाचे आगमन झाले आणि सामना रद्द करावा लागला.

टॅग्स :आॅस्ट्रेलियापाकिस्तान