हैदराबाद, आयपीएल 2019 : ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने इंडियन प्रीमिअर लीगचे 12वे हंगाम गाजवले. सलग आठ अर्धशतकी खेळी करून त्याने सनरायझर्स हैदराबादच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याच्या या खेळीमुळे हैदराबादच्या प्ले ऑफच्या आशा बळावल्या आहेत. पण, सोमवारी किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेला सामना हा त्याचा आयपीएलमधील अखेरचा ठरला. त्यामुळे संघासोबत पुढील वाटचालीत त्याला हातभार लावता येणार नाही. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी तो ऑस्ट्रेलिया संघाच्या सराव सत्रात सहभागी होण्यासाठी मायदेशात रवाना झाला आहे. अखेरच्या सामन्यात विजय मिळवल्याचे समाधान घेत त्याने सहकाऱ्यांचा भावनिक निरोप घेतला आहे. विशेष म्हणजे त्याचा हा भावनिक संदेश संघसहकारी भुवनेश्वर कुमारने शूट केला.
या सामन्यानंतर वॉर्नरने इंस्टाग्रामवरही भावनिक पोस्ट केली. त्याने लिहिले की,''
सनरायझर्स हैदराबाद संघाने दिलेल्या पाठींब्याचा मी खूप आभारी आहे. यावर्षीच नाही तर गतवर्षीही त्यांनी मला खचू दिले नाही. या संघाकडून खेळण्यासाठी मला बरीच प्रतीक्षा पाहावी लागली. संघ मालक, साहाय्यक खेळाडू, सहकारी, सोशल मीडिया टीम आणि चाहते या सर्वांचे खूप खूप आभार. त्यांनी दाखवलेल्या विश्वासावर मी खरा उतरलो, याचा आनंद.. पुढील वाटचालीसाठी संघाला शुभेच्छा.''
वॉर्नरने 12 सामन्यांत 69.20 च्या सरासरीने 692 धावा चोपल्या आहेत. त्यात एक शतक आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. पत्नी कॅनडीसनेही वॉर्नरच्या खेळीचे कौतुक केले.
चेंडु कुरतडणाच्या प्रकरणानंतर वॉर्नर एका वर्षांनंतर राष्ट्रीय संघात परतणार आहे. 30 मे पासून वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
पाहा व्हिडीओ...
https://www.iplt20.com/video/183671/cameraman-bhuvi-captures-warner-s-srh-journey