Join us

ऑस्ट्रेलियाच्या संघाने जिंकली मने! बक्षीस म्हणून मिळालेली रक्कम श्रीलंकेच्या मुलांना केली दान

भारताच्या शेजारील देश श्रीलंका सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 16:12 IST

Open in App

नवी दिल्ली : भारताच्या शेजारील देश श्रीलंका सध्या आर्थिक संकटाचा (Sri Lanka Crisis) सामना करत आहे. श्रीलंकेत सध्याच्या घडीला सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे. देशातील नागरिकांना गरजू वस्तूंसाठी इतरत्र भटकावे लागत आहे. त्यामुळे आशिया चषक २०२२ चे आयोजन श्रीलंकेत न होता यूएईच्या धरतीवर होणार आहे. आशिया चषकाचे यजमानपद श्रीलंकेने यूएईला सोपवले आहे. श्रीलंकेत आर्थिक संकट असतानाच ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. ऑस्ट्रेलियाने ७ जून ते १२ जुलै दरम्यान श्रीलंकेत ३ टी-२० आंतरराष्ट्रीय, ५ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळली होती. 

ऑस्ट्रेलियाने जिंकली मनेदरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या संघाने खेळाडूंना बक्षीस म्हणून मिळालेली रक्कम श्रीलंकेतील लहान मुलांना दान करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आर्थिक संकटात जीवनाशी संघर्ष करत असलेल्या लहानग्यांना कांगारूच्या खेळाडूंनी मदत केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत माहिती देताना म्हटले, ३० हजार अमेरिकन डॉलर्स (जवळपास २४ लाख रूपये) ऑस्ट्रेलियाच्या संघाने श्रीलंकेतील लहान मुलांना दान केले आहेत. 

"श्रीलंकेतील आर्थिक संकटाचा श्रीलंकेच्या दैनंदिन जीवनावर किती वाईट परिणाम झाला आहे हे आम्ही पाहिले होते. ही रक्कम युनिसेफच्या माध्यमातून श्रीलंकेतील लहान मुलांपर्यंत पोहचवली जाईल", असे ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने सांगितले. ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-२ ने श्रीलंकेचा पराभव केला होता. तर यजमान श्रीलंकेने एकदिवसीय मालिकेत ३-२ ने विजय मिळवून कांगारूच्या संघाला धूळ चारली होती. तर कसोटी मालिका १-१ अशा बरोबरीत संपली होती. 

 

टॅग्स :आंतरराष्ट्रीय क्रिकेटआॅस्ट्रेलियाश्रीलंका
Open in App