मुंबई - तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौºयावर आलेल्या आॅस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने सराव सामन्यात भारत ‘अ’ संघाचा तब्बल ३२१ धावांनी फडशा पाडत भारताच्या मुख्य संघाला धोक्याचा इशारा दिला. प्रथम फलंदाजी करताना आॅस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकांत ८ बाद ४१३ धावांचा एव्हरेस्ट उभारल्यानंतर भारतीय महिलांचा डाव केवळ ९२ धावांत संपुष्टात आला.
मुंबईतील बीकेसी मैदानावर भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाला हे आव्हान पेलवले नाही. अत्यंत सावध सुरुवात करूनही भारतीय संघाची अवस्था १६ षटकांत ६ बाद ५४ धावा अशी झाली होती. यानंतर उर्वरित ४ बळी पुढील ३८ धावांत मिळवत आॅसीने धमाकेदार विजय मिळवला. या दमदार विजयाच्या जोरावर आॅस्टेÑलियाने यजमानांना एक प्रकारे इशाराच दिला आहे. मेगन स्कट हिने ३, तर एलिस पेरी व अमांदा जेड वेलिंग्टन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. कर्णधार अनुजा पाटीलने सर्वाधिक १६ धावांची खेळी केली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या आॅसी महिलांनी चौफेर फटकेबाजी करताना गोलंदाजांची बेदम पिटाई केली. बेथ मूनी हिने ८३ चेंडूंत १८ चौकारांसह ११५ धावांचा तडाखा दिला. ती निवृत्त झाल्यानंतर एलिस पेरी (५८ चेंडूंत ६५ धावा) व नवव्या क्रमांकावरील अॅश्लेह गार्डनर (४४ चेंडूंत ९० धावा) यांनी तुफानी हल्ला करत आॅस्टेÑलियाला चारशेच्या पार नेले. त्याआधी सलामीवीर निकोल बोल्टन हिनेही ३८ चेंडूंत ५८ धावांची आक्रमक खेळी केली.
संक्षिप्त धावफलक :
आॅस्टेÑलिया महिला : ५० षटकांत ८ बाद ४१३ धावा (बेथ मूनी ११५, अॅश्लेह गार्डनर ९०, एलिस पेरी ६५, निकोल बोल्टन ५८; सारिका कोळी ३/६७, कविता पाटील २/५८) वि.वि. भारत महिला : २९.५ षटकांत सर्वबाद ९२ धावा (अनुजा पाटील १६, कविता पाटील १४; मेगन स्कट ३/२४, अमांदा जेड वेलिंग्टन २/११, एलिस पेरी २/११)