सिडनी: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी दिग्गज फलंदाज आणि दोनवेळा विश्वचषक उंचावणारा खेळाडू डेमियन मार्टिन सध्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. ५४ वर्षीय मार्टिनला ब्रिस्बेन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याला 'इंड्युस्ड कोमा'मध्ये ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 'बॉक्सिंग डे'ला मार्टिनची प्रकृती अचानक बिघडली. सुरुवातीला अस्वस्थ वाटू लागल्याने तो विश्रांतीसाठी झोपला होता, मात्र प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. तपासणीअंती त्याला मेंदूज्वर झाल्याचे निदान झाले आहे. हा आजार मेंदू आणि मणक्याच्या संरक्षक पडद्याला होणारा संसर्ग आहे, जो अत्यंत घातक मानला जातो.
मैदानातील तो 'क्लास' फलंदाज
डेमियन मार्टिन हा त्याच्या मोहक आणि तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जायचा. २००३ च्या विश्वचषक फायनलमध्ये भारताच्या विरोधात तुटलेल्या बोटाने फलंदाजी करत त्याने नाबाद ८८ धावांची खेळी केली होती. त्याने ऑस्ट्रेलियासाठी ६७ कसोटी आणि २०८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत ४६.३७ च्या सरासरीने त्याने ४,४०६ धावा केल्या असून त्यात १३ शतकांचा समावेश आहे.
दिग्गजांकडून प्रार्थना मार्टिनचा जवळचा मित्र आणि माजी सहकारी ॲडम गिलख्रिस्ट याने सांगितले की, "मार्टिनवर सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असली तरी त्याला सर्वोत्तम उपचार दिले जात आहेत. त्याचे कुटुंब आणि जवळचे मित्र सध्या कठीण प्रसंगातून जात असून सर्वांनी त्याच्यासाठी प्रार्थना करावी."
माजी प्रशिक्षक डॅरेन लेहमन यानेही सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, "खूप प्रेम आणि प्रार्थना... तू एक लढवय्या आहेस, लवकर बरा होऊन परत ये."