ब्रिस्बेन - स्टीव्ह स्मिथच्या नाबाद ९१ आणि ग्लेन मॅक्सवेलच्या ७० धावांच्या बळावर विश्वचषकाची तयारी म्हणून खेळविण्यात आलेल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया एकादशने शुक्रवारी न्यूझीलंड एकादशचा डकवर्थ-लुईस नियमाच्या जोरावर पाच गड्यांनी पराभव केला.
त्याआधी विल यंग याच्या सलग दुसऱ्या शतकी खेळीच्या बळावर न्यूझीलंडने ५० षटकात ९ बाद २८६ पर्यंत मजल गाठली होती. अंधुक प्रकाशामुळे सामना थांबविण्यात आला, तोपर्यंत ऑस्ट्रेलियाने ४४ षटकात पाच बाद २४८ धावा उभारल्या होत्या. डकवर्थ-लुईस नियमानुसार त्यांना ४४ षटकात विजयासाठी २३३ धावांची गरज होती.
चेंडू कुरतडल्याप्रकरणी वर्षभराची बंदी भोगून आलेला माजी कर्णधार स्मिथने सलग दुसऱ्यांदा अर्धशतकी खेळी करीत ९१ धावा ठोकल्या. मॅक्सवेलदेखील फॉर्ममधये आहे. त्याने ४८ चेंडूत ७० धावांचे योगदान दिले. बुधवारी त्याने वेगवान ५२ धावा फटकविल्या होत्या.
२६ वर्षांचा युवा खेळाडू विल यंग हा विश्वचषकात न्यूझीलंड संघात नाही. त्याने बुधवारी १३० आणि आज पुन्हा १११ धावा केल्या. ब्रिस्बेनच्या या अनधिकृत सामन्यात सलामीवीर जॉर्ज वर्कर याने ५९ धावांचे योगदान दिले. आॅस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स याने आठ षटकात ३२ धावात चार गडी बाद केले. जखमेतून सावरलेला दुसरा गोलंदाज मिशेल स्टार्क याने एक बळी घेतला. मार्कस् स्टोयनिस याला दोन बळी मिळाले. तीन सामन्यांची मालिका आॅस्ट्रेलियाने २-१ ने जिंकली. (वृत्तसंस्था)