हर्षा भोगले लिहितो..
आॅस्ट्रेलियावर अॅशेस मालिकेपूर्वी रित्या हाताने परतण्याची वेळ आली होती, पण आता भारताविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेतून त्यांना काही अंशी दिलासा मिळविण्याची संधी प्राप्त झाली आहे.
त्यांनी कसोटी मालिका गमावली, त्यानंतरही वन-डे सामन्यांच्या मालिकेतही त्यांचे पानिपत झाले. जर टी-२० मालिकाही गमावली तर त्यांच्यावर क्लीन स्वीपची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे. आॅस्ट्रेलियन क्रिकेटची प्रतिमा बघता ही बाब त्यांच्यासोबत न्याय करणारी नक्कीच ठरणार नाही. त्यामुळे आता टी-२० मालिकेच्या अखेरच्या लढतीच्या निमित्ताने त्यांना काहीतरी मिळवण्याची संधी आहे. गुवाहाटीमधील दोन बाबींमुळे ते हैदराबादमध्ये अधिक आशावादी असतील. चेंडू जर स्विंग होत असेल तर भारताच्या आघाडीच्या फळीवर वर्चस्व गाजवता येते, याची त्यांना चांगली कल्पना आली आहे. यापूर्वी मोहंमद आमीरने जे केले ते बेहरेनडोर्फने केले. भारताच्या दिग्गज फलंदाजांविरुद्ध त्यांना यशाचे सूत्र गवसले आहे. मोईसेस हेन्रिक्स व ट्रॅव्हिस हेड
यांनी फिरकी माºयाला समर्थपणे तोंड दिले. आता आपण भारतावर वर्चस्व गाजवू शकतो किंबहुना त्यांना पराभूत करू शकतो, असा विश्वास आॅस्ट्रेलियन संघात निर्माण झाला आहे. टी-२०च्या एका लढतीच्या निकालाची फारशी चिंता न करता भारताने वर्चस्व गाजवण्याच्या निर्धाराने खेळायला हवे. भारताने जर सुरुवातीला झटपट विकेट गमावल्या तर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश येते ही यजमान संघासाठी चिंतेची बाब आहे. यापूर्वी हे दोन-तीनदा घडले आहे. वेस्ट इंडिजमध्ये एकदा असेच घडले होते. भारताला १४० ऐवजी केवळ ११८ धावाच फटकावता आल्या हा चिंतेचा विषय आहे. पण, हैदराबाद भारतीय संघासाठी प्रेरणादायी आहे.
आॅस्ट्रेलिया संघ मिळालेल्या संधीचा उपयोग करतो की भारतीय संघ दमदार पुनरागमन करीत टी-२० मालिकेत बाजी मारतो, याबाबत उत्सुकता आहे. हैदराबादची खेळपट्टी कशी आहे याची मला कल्पना नसली तरी येथे चेंडू थांबून आला आणि वळला तर आॅस्ट्रेलिया संघाला संघर्ष करावा लागेल, हे निश्चित. (पीएमजी)