भारतीय संघाचा कॅप्टन आणि संघाच्या गोलंदाजीतील 'हुकमी एक्का' जसप्रीत बुमराहनं सिडनी मैदान सोडलं आहे. स्कॅनिंगसाठी तो काही स्टाफ सदस्यांसोबत रुग्णालयात जाताना स्पॉट झाले. त्याची दुखापत गंभीर नसावी, अशीच प्रार्थना टीम इंडिया आणि भारतीय चाहते करत असतील. जसप्रीत बुमराहनं फिल्ड सोडल्यावर विराट कोहली टीम इंडियाची कॅप्टन्सी करताना दिसत आहे. त्याला नेमकी कोणती समस्या आहे, ते अद्याप समोर आलेले नाही. त्याची ही समस्या गंभीर असेल तर टीम इंडियासाठी तो मोठा फटकाच असेल. रिपोर्ट्स काय येणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना सिडनीच्या मैदानात सुरु आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करत आहे. या मालिकेत त्याने सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळातील पहिल्या सत्रात त्याने संघाला एक महत्त्वपूर्ण विकेटही मिळवून दिली. पण उपहारानंतर तो मैदानात दिसला नाही.
स्टाफ सदस्यांसोबत मैदानाबाहेर जाताना स्पॉट झाला बुमराह
जसप्रीत बुमराह लंचनंतर सपोर्ट स्टाफसोबत मैदानाबाहेर जाताना स्पॉट झाले. यावेळी त्याने टिम इंडियाच्या जर्सी ऐवजी ट्रेनिंग किट घातल्याचे झाल्याचे पाहायला मिळाले. तो पार्किंगमधील कारमधून रुग्णालयात गेल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येते. जसप्रीत बुमराहाला काहीतरी दुखापत झाली असून त्याला स्कॅनिंगसाठी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. पण त्याला नेमकं काय झालंय ते मात्र गुलदस्त्यातच आहे.
बुमराहची दमदार कामगिरी
जसप्रीत बुमराहनं ऑस्ट्रेलियाच्या मालिकेत आतापर्यंत ३२ विकेट्स घेतल्या आहेत. सिडनी कसोटी सामन्यात त्याने १० षटके गोलंदाजी करताना २ विकेट्स घेतल्या आहेत. तो मैदानातून अचानक बाहेर गेल्यावर नेतृत्वाची जबाबदारी ही कोहलीच्या खांद्यावर असून गोलंदाजीची मदार मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर आहे.