Australia vs India 5th Test Day 2 : सिडनीच्या मैदानात रंगलेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं दमदार गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १८१ धावांवर रोखले आहे. स्टार गोलंदाज आणि कर्णधार जसप्रीत बुमराहनं अचानक मैदान सोडल्यावर प्रसिद्ध कृष्णाला नितीशकुमार रेड्डीनं उत्तम साथ दिली. दोघांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के दिले. मोहम्मद सिराजनं अखेरची विकेट्स घेतली. भारतीय संघानं पहिल्या डावात १८५ धावा केल्या होत्या. यासह टीम इंडियानं अखेरच्या कसोटी सामन्यात ४ धावांची अल्प आघाडी मिळाली आहे. भारतीय संघाकडून मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णानं प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाकडून बो वेब्स्टर (Beau Webster) याने सर्वाधिक ५७ (१०५) धावा केल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आघाडीच्या फलंदाजांनी नागी टाकल्यावर स्मिथनं पदार्पण करणाऱ्या खेळाडूसोबत सावरला संघाचा डाव
सॅम कॉन्स्टास (Sam Konstas) आणि मार्नस लाबुशेन या जोडीनं १ बाद ९ धावांवरुन दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. जसप्रीत बुमराहनं लाबुशेनला २ धावांवर तंबूत धाडत संघाला दुसरं यश मिळवून दिले. त्यानंतर मोहम्मद सिराजनं एका षटकात सॅम कॉन्स्टास २३ (३८ आणि) ट्रॅविस हेड ४(३) यांची विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के दिले. ३९ धावांत ऑस्ट्रेलियानं संघाचे आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतर स्मिथ आणि पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या बो वेब्स्टर या जोडीनं ५७ धावांची भागीदीर करत संघाचा डाव सावरला.
टीम इंडियाकडून सिराज अन् प्रसिद्ध कृष्णानं घेतल्या प्रत्येकी ३-३ विकेट्स
प्रसिद्ध कृष्णानं स्मिथला ३३ धावांवर तंबूचा रस्ता दाखवत ही जोडी फोडली. स्मिथ तंबूत परतल्यार बो वेब्स्टर याने कॅरीच्या साथीनं सहाव्या विकेटसाठी ४१ धावांची भागीदारी रचला. प्रसिद्ध कृष्णा पुन्हा टीम इंडियाच्या मदतीला आला अन् त्याने कॅरीचा खेळ २१ धावांवर खल्लास केला. कॅप्टन पॅट कमिन्स १० धावांवर नितीशकुमार रेड्डीच्या जाळ्यात फसला. मिचेल स्टार्कची विकेटही नितीशकुमारनंच घेतली. अर्धशतकी खेळी करणाऱ्या बो वेब्स्टरला प्रिसद्ध कृष्णानं यशस्वी जैस्वालकरवी झेलबाद केले. बोलँडला बोल्ड करत सिराजनं ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १८१ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराहनं दोन विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या.