AUS vs IND, 4th Test Day 4 Yashasvi Jaiswal drops a simple catch of Marnus Labuschagne मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल यानं मार्नस लॅबुशेनचा कॅच सोडला. 'गल्ली'तील गोंधळानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि गोलंदाज आकाश दीप युवा जैस्वालवर चांगलेच भडकल्याचे दिसून आले. गल्ली फिल्ड पोझिशनवर जैस्वालच्या हाती अगदी सोपा कॅच आला होता. पण त्याला तो कॅरी करता आला नाही.
आघाडीचे फलंदाज स्वस्तात तंबूत, मार्नस लाबुशेन मिळालेल्या संधीचं केलं सोनं
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी आघाडीच्या फलंदाजांना सुरुंग लावल्यावर लाबुशेन हा एकमेव फलंदाज मैदानात उभा राहिला. ज्याने अर्धशतक साजरे केले. आकाशदीपच्या गोलंदाजीवर जर यशस्वी जैस्वालनं त्याचा झेल टिपला असता तर ऑस्ट्रेलियन संघाची अवस्था आणखी बिकट झाली असती. त्यामुळे रोहित आणि आकाशदीप यांनी युवा यशस्वीच्या अपयशी प्रयत्नावर संतप्त झाल्याचे दिसून आले.
यशस्वीची चूक चांगलीच महागात पडली, लाबुशेन यानं फिफ्टीसह सावरला डाव
यशस्वी जैस्वाल हा टीम इंडियातील सर्वोत्तम फिल्डरपैकी एक आहे. पण ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात यशस्वी एकदा दोनदा नव्हे तर तीनदा कॅचच्या पकडण्यात अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियानं शंभरीच्या आत ९९ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या. पण ही संधी हुकली अन् मग लाबुशेन याने फिफ्टी ठोकून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरणारी खेळी केली. ऑस्ट्रेलियन संघानं पहिल्या डावात १०५ धावांची आघाडी घेऊन दुसऱ्या डावाला सुरुवात केली होती. पहिल्या डावात हिट ठरलेले सर्व खेळाडू स्वस्तात माघारी फिरल्यामुळे ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत सापडला होता. त्यात लाबुशेने याची फिफ्टी हुकली असती तर संघ आणखी अडचणीत आला असता. पण यशस्वीनं केलेली चूक त्याच्या खेळीला हातभार लावण्यासह टीम इंडियाच टेन्शन वाढवणारी ठरली.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात यशस्वीनं सोडले ३ कॅच
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील तिसऱ्या षटकात बुमराहाच्या गोलंदाजीवर यशस्वी जैस्वालनं सलामीवीर उस्मान ख्वाजाचा कॅच सोडला. त्यानंतर ४० व्या षटकातील आकाशदीपच्या गोलंदाजीवरील दुसऱ्या चेंडूवर यशस्वीनं लाबुशेनची विकेट मिळवण्याची सोपी संधी गमावली. या दोघांशिवाय ४९ व्या षकात जड्डूच्या गोलंदाजीवर पॅट कमिन्सचा कॅचही त्याने ड्रॉप केला.