Australia vs India 4th Test, Day 3, Lunch मेलबर्नच्या मैदानात सुरु असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीतील तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्रही ऑस्ट्रेलियानं आपल्या नावे केले. रिषभ पंत ६ (७) आणि रवींद्र जडेजा ४ (७) या जोडीनं ५ बाद १६४ धावांवरून तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. रिषभ पंतने सुरुवातीलाच आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा दाखवून दिला. पण मैदानात तग धरून मोठी खेळी करण्यात तो पुन्हा चुकला. त्याच्या रुपात टीम इंडियानं १९१ धावांवर सहावी विकेट गमावली. रिषभ पंतनं ३७ चेंडूत २८ धावांची खेळी केली. नॅथन लायन याने जड्डूला चकवा देत टीम इंडियाला आणखी एक धक्का दिला. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील २७ षटकात टीम इंडियाने ८० धावांत २ विकेट्स गमावल्या. यालब हे सत्रही ऑस्ट्रेलियाने आपल्या नावे केले.
नितीश रेड्डी फिफ्टीच्या उंबरठ्यावर
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ संकटात असताना नितीश रेड्डीनं सातत्यपूर्ण दमदार कामगिरी करून दाखवली आहे. मेलबर्न कसोटी सामन्यात टीम इंडियावरील फॉलोऑनच संकट टाळण्याची जबाबदारी पुन्हा त्याच्या खांद्यावर आली आहे. उपहारापर्यंत त्याने ६१ चेंडूचा सामना करत ४० धावा करत आणखी एक आश्वासक खेळी करण्यास सज्ज असल्याचे संकेत दिले. पहिल्या अर्धशतकासह तो टीम इंडियाला संकटातून बाहेर काढेल, हीच अपेक्षा आहे. त्याच्यासोबत वॉशिंग्टन सुंदरही मैदानात असून तो २७ चेंडूचा सामना करून ५ धावांवर खेळतोय. भारतीय संघाने उपहारापर्यंत ७ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर २२७ धावा लावल्या आहेत. फॉलोऑन टाळण्यासाठी भारतीय संघाला अजून ३१ धावांची गरज आहे.