ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू झालेल्या ॲशेस कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने अवघ्या दोन दिवसांत सनसनाटी विजय मिळवला आहे. गोलंदाजीला अनुकूल असलेल्या पर्थच्या खेळपट्टीवर दुसऱ्या डावात ट्रॅव्हिस हेडने टी-२० स्टाईलमध्ये ठोकलेल्या शतकाच्या जोरावर २०५ धावांच्या आव्हानाचा ऑस्ट्रेलियाने आठ गडी राखून सहज फडशा पाडला. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिकेत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली आहे.
काल सुरू झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडचा डाव अवघ्या १७२ धावांत गुंडाळून जोरदार सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर इंग्लंडचा कप्तान बेन स्टोक्स याने कांगारूंवर जोरदार प्रतिहल्ला करत ऑस्ट्रेलियाचा डाव अवघ्या १३२ धावांत गुंडाळला. त्याबरोबरच फलंदाजीसाठी अत्यंत कठीण असलेल्या खेळपट्टीवर इंग्लंडला ४० धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली.
मात्र या आघाडीचा इंग्लंडच्या संघाला फायदा घेता आला नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी पुन्हा एकदा टिच्चून मारा करत इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या १६४ धावांवर संपुष्टात आणला. त्यामुळे ही लढत रंगतदार स्थितीत पोहोचली. इंग्लंडचे गोलंदाज पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवणार का? याबाबतत तर्कवितर्क लढवले जात होते. त्याचदरम्यान, ऑस्ट्रेलियाकडून सलामीला उतरलेल्या ट्रॅव्हिड हेड याने सामन्याचे चित्रच पालटून टाकले.
हेड याने सुरुवातीपासूनच चौकार, षटकारांची बरसात करून इंग्लंडच्या गोलंदाजीवर दबाव आणला. त्याने अवघ्या ६९ चेंडूत शतक पूर्ण केले. यादरम्यान, हेडने जॅक वेथरल्डसोबत ७५ आणि मार्नस लाबुशेनसोबत ११७ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला . अवघ्या ८३ चेंडूत १६ चौकार आणि ४ षटकारांसह १२३ धावा कुटून हेड बाद झाला. मात्र तत्पूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला होता. अखेरीस मार्शल लाबुशेन (नाबाद ५१) आणि स्टिव्हन स्मिथ (नाबाद २) यांनी ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.