AUS vs ENG 3rd Ashes Test, Nathan Lyon Breaks Record Of Glenn Mcgrath : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील प्रतिष्ठित अॅशेस कसोटी मालिकेतील तिसरा सामना ॲडलेड येथील ओव्हलच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळातील पहिल्याच षटकात दोन विकेट्सचा डाव साधत फिरकीपटू नॅथन लायन (Nathan Lyon) याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्याने ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) याला मागे टाकले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मॅकग्राचा मोठा विक्रम मोडला; लायनचं सेलिब्रेशनही चर्चेत
३८ वर्षीय नॅथन लायनने सर्वप्रथम ओली पोपला बाद केलं. अॅडलेड कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पोपने मिडविकेटच्या दिशेने फटका मारला, मात्र तिथे जोश इंग्लिसने अप्रतिम झेल पकडला. या विकेटसह लायनने मॅक्ग्राच्या विक्रमाशी बरोबरी साधली. यानंतर त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लायनने बेन डकेटला क्लीन बोल्ड केलं. या विकेटसह लायन मॅक्ग्राच्या पुढे गेला आणि हा महान विक्रम आपल्या नावावर केला. हा टप्पा गाठल्यानंतर लायनने जोरदार जल्लोष करत आनंद व्यक्त केला.
आधी गंभीरसोबत ओपनिंग; आता IPL लिलावात 'त्या' खासदाराच्या लेकावर शाहरुखच्या KKR नं लावला पैसा!
ऑस्ट्रेलियाकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दिवंगत आणि दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न अव्वलस्थानी आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. त्यापाठोपाठ आता नॅथन लायन दुसऱ्या क्रमांकावर आहे.
- शेन वॉर्न - ७०८
- नॅथन लायन - ५६४*
- ग्लेन मॅकग्रा - ५६३
- मिचेल स्टार्क - ४२०*
- डेनिस लिली – ३५५
टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे आघाडीचे पाच गोलंदाज
- मुथय्या मुरलीधरन - ८००
- शेन वॉर्न - ७०८
- जेम्स अँडरसन - ७०४
- अनिल कुंबळे - ६१९
- स्टुअर्ट ब्रॉड - ६०४
इंग्लंडचा संघ या सामन्यातही पिछाडीवर
तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघाने ३७१ धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडच्या संघाने ८ विकेट्सच्या मोबदल्या २१३ धावा केल्या होत्या. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स १५१ चेंडूत ४५ धावांवर नाबाद खेळत होता. दुसऱ्या बाजूला जोफ्रा आर्चर ४८ चेंडूत ३० धावांवर खेळत होता. मालिकेत २-० पिछाडीवर असलेला इंग्लंडचा संघ या सामन्यात १५८ धावांनी मागे आहे.